बुधवार, २८ जुलै, २०२१

आणि भुतदया नडली...


प्रत्येकाच्या संसाराची सजावट ही कायम लक्षात राहते, अगदी सुरवातीचे दिवस... असंख्य आठवणी.. कोणते सामान कधी अन कसे घेतले ? तेव्हा आलेल्या अडचणी आणी बरेच काही.

तशी यावर कधी विशेष चर्चा होत नाही पण काही गोष्टी मात्र अचानक आठवतात. माझ्यासारख्या भावनिक व्यक्तीला तर रडायला पण येते. गेले दोन दिवस असेच एक एक आठवत आहे. 

आमच्या कामाचा एरिया जवळ व्हावा म्हणून ज्यांचे घर ऑफ़िस साठी भाड्याने घेतले होते, तेथेच वरच्या दोन खोल्या रिकाम्या झाल्या आणि मागचा पुढचा विचार न करता आम्ही ती जागा रहायला घेतली. लग्नाला जेमतेम दिड वर्षे होत आले होते. आई पाहणी करण्यासाठी पाहुणी म्हणून आलेली. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या खोल्याना सिमेंटची पत्रे होती. आमच्याकडे पंखा नाही की कुलर नाही. 

यापूर्वी जिथे रहायचो ते घर मोठं आणि फ्लैट असल्याने पंखे वैगेरे सगळे ठीक होत. घरी पंखा असला पाहिजे हा विचार करायला वेळ अन पैसा दोन्ही नव्हता. तसा आमचा संसार पाहून ती खूश होती. सन्स्था नविन असली तरी काम पाहून अजुन तिला जरा जास्त आनंद झाला होता.

दुसर्या दिवशी बाहेर फिरायला गेली आणी येताना घरी लागणारं काही सामान घेवुन आली. पंखा पण आणला. भिंतीवर लावायचा. काही बोलली नाही. मी पण शांतच राहिले... तो उन्हाळा त्या पंख्याने सुसह्य केला म्हणायला हरकत नाही.

आता गेली साडेतीन वर्षे आमच्याकडे टीवी नाही. गाथा टीवी एंकरसोबत गप्पा मारायला लागली होती. मग काय ? बंद केला आणी किती दिवस बंद ठेवायचा या विचाराने माझ्या सखीला दिला.

लग्नानंतर जवळपास दोन वर्षं टीवी नव्हता आणि आम्हाला गरज पण वाटली नव्हतीच. पण आमचे दादा म्हणजे माझे मोठे दीर(घरी सगळे त्याना दादाच बोलतात) एकदा कर्जत वरुन आले. नविन टीवी आणी त्याची फिटिंग करुन देणारा माणुस घेवुन. नंतर केबलवाल्याकडे जावुन केबल पण बसवून घेतली. गरज नसली तरी टीवी आला आणी मग गरज बनला. टीवी अन पंखा सोडला तर बर्यापैकी सामान आम्ही दोघानी खरेदी केलेले.

जे सामान मला गरजेचे असेल कदाचीत दुसरया कुनाला ते सोईसाठी वाटेल. आम्हा दोघानाही कपडे धुण्याचे मशीन सगळ्यात गरजेचं आहे असे वाटले होते. पण घेणार कसं? जवळपास एक किलोमीटर अंतरावर माझे मोठे दीर रहायचे. ताई पण बोलताना म्हनाल्या की नविन मशीन घ्यायचं आहे. मग काय नवर्याला सान्गितलं दादांशी बोला. म्हनाव, हफ्ता देईल वेळेवर एक नाही तर दोन मशिनी घे. हफ्ताने परतफेड झाली मशीन घरी आली. पानी येण्याची वेळ खुप विचित्र होती, आम्ही बाहेर असायची पण ऑटोमेटिक मशीन असल्याने कपडे धुऊन तयार रहायचे.

या आठवड्यात दोन तीन दिवस पाण्याची कमतरता होती. पानी साठवायला काहिच सोय नाही. मग मशीन मध्ये पानी भरुन ठेवले. झाले... काल मशीन सुरु करते तर काहिच प्रतिसाद नाही. काहिच सुचत नव्हतं. तेव्हा कळलं की ही मशीन माझ्यासाठी किती महत्वाची आहे. जर मशीन दुरुस्त नाही झाली तर... नुसत्या विचाराने डोळ्यांत पाणी.. आम्ही एकमताने सोबत घेतलेली पहिली वस्तू म्हणजे ही मशीन..
मैकेनिक ला फोन केला. बघीतलं तर उंदरांने आतमधील वायर सगळी कुरतडली होती. 
उंदिर? बापरे म्हणजे पक्ष्याना पिण्याचे पाणी आणी खायला ठेवते.. तर.. त्या पक्षी अन खारूताई सोबत उंदिर पण येतात तर? 
चारएक हजार खर्च येईल. बापरे? मनात आलं महिनाअखेर, खाते रिकामे.. पण.. मशीन नसेल तर? बाकी एवढे काम करते ते काय कमी आहेत की काय? माझ्या हातचे कपडेधुलाई व्यवस्थीत नाही. काहीही झाले तरी मशीन दुरुस्त झाले पाहिजे. बस्स..