बुधवार, ६ एप्रिल, २०२२

मानसिकता जवळपास सारखीच...

काही दिवसांपूर्वी आमच्या बिल्डिंगच्या गेटजवळ एक चारचाकी थांबली. 7/8 वर्षांच्या मुलासोबत त्याचे आईवडील आणि आजी गाडीतून उतरले. गेटमधून आत आले आणि तो छोटा मुलगा परत मागे वळला. गेटच्या बाहेर जाऊन आवाराच्या भिंतीकडे तोंड करून त्याने लघवी केली. तोपर्यंत त्याचे आईवडील घरात पोहचले होते. पहिल्या मजल्यावर असलेल्या कुटुंबाकडे ते पाहुणे म्हणून आले होते. खर तर, पहिल्याच मजल्यावर जायचं होतं, गेटबाहेर करण्यापेक्षा तो मुलगा धावत पळत वर जाऊन बाथरूममध्ये पण जाऊ शकत होता. त्याच्या मामाचं घर आहे, नेहमी येत असतो तो इकडे पण... सामाजीकरण / Socialisation सुरवातीला घरातून होते, असे म्हणतात मग या गोष्टींचा समावेश बहुतेक घरात होत नसावा. बागेत सुद्धा आया आपल्या मुलांना सहज बोलतात जा तिकडे कर, जेव्हा की व्यवस्थित सोय केलेली असते. आणि मग पुरुष जेव्हा असे कुठेही भिंतीकडे तोंड करून उभे दिसले की म्हणायचं की पुरुषांना लाज वाटत नाही... असल्या कृतीचं समर्थन मुळीच नाही पण ज्या समाजीकरणाच्या प्रक्रियेत मुली/ महिला घडविल्या जातात, अगदी तसेच मुलं/ पुरुष पण घडविले जातात. फक्त मुलींना बंधन शिकविली जातात तर मुलांना निर्लज्ज वागणं? 

घटना एक

काल परवाचीच घटना, आम्ही दोघी मायलेकी आमच्या ओळखीच्या घरी गेलो होतो. माझ्या लेकीपेक्षा एक वर्षे मोठा असलेला मुलगा, आई गृहिणी पण इंजिनिअरची डिग्री असलेली तर वडील कॉलेजमध्ये शिकवणारे. आमच्या गप्पा सुरु असतांना ही दोन्ही मुले आम्ही बसलो त्याच हॉलमध्ये आमच्या समोर खेळत होती. पाच वाजत आले आणि ऊन जरा कमी झाले म्हणून समोरचे दार उघडलं आणि ही दोन्ही पोरं अंगणात खेळू लागली. फक्त गेटच्या आत खेळा असे सांगून आम्ही हॉलमध्येच बसलो होतो. काही वेळाने माझी लेक आत येऊन मला म्हणाली, त्याला असं काय आहे? त्याने पकडून कुंडीतील झाडावर सु सु केली.. पहिल्यांदाच पाहिलं म्हणून तिला प्रश्न पडणे साहजिकच होतं. तिला तर सांगितले पण त्या मुलाच्या आईला सांगितलं की मुलांना याच वयात अश्या गोष्टींचं योग्य वळण लावलं पाहिजे. तर लगेच त्या मुलाची आजी ( तिची आई )भडकली, आम्ही काय त्याला बाहेर मुतायला शिकवतो काय? आता बाहेर एवढे लोकं करतात तर आम्ही घरात येतो. मोठा झाला की कळेल त्याला... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती म्हणाली की आमच्या पोराला सांगण्यापेक्षा तुझ्या पोरीला सांग ना की कोणी अस मुतत असेल तर तिकडे पाहू नको... अर्धी दुनिया असे करते, कोणाकोणाला सांगशील... खरं तर मी त्यांच्या घरी पाहुणी तरी ती बाई येवढं बोलली, समजा दुसरं कोणी असते तर? यात एक गोष्ट म्हणजे हे सर्व बोलणं होत असताना त्या मुलाची आई मात्र शांत होती.

घटना दोन

एका एनजीओमध्ये बेघर मुलांसोबत काम करणारी बारावीपर्यंत शिकलेली धार्मिक घरातील मैत्रीण. अश्या धार्मिक लोकांकडे असते तसे तिच्या घरी सुद्धा एका बापूचे पूजन व्हायचं. त्याच्या सत्संगाला जाणारी ही मंडळी. त्यांच्या घरी त्याच्या फोटोचं रोज पूजन व्हायचं, आणि त्या स्वयंघोषित संतावर स्त्रियांच्या शोषणाचे आरोप झाले. त्याला पोलीस कस्टडी आणि नंतर कारागृहात रवानगी झाली. त्यानंतर तिच्या घरी तो फोटो अन पूजन दिसलं, तिला विचारले असता ती म्हणाली, तो पुरुष आहे, तो नालायक आहे पण या स्त्रिया का जवळ जातात? कुणी स्वताहून तर असं काही करणार नाही, बायांना समजत नाही का या माणसाची नियत खराब आहे? सस्तंग ऐकावं, प्रसाद घ्यावा, गर्दी असेल तेव्हाच रहावं तिथे मग कुणाची हिम्मत होईल. बाया लगट करतात मग त्याला संधी भेटल्यावर तो कश्याला सोडेल? बापू, संत महात्मा असला तरी, आहे तर पुरूष....

घटना तीन

पदव्युत्तर शिक्षण घेतलेली. चार पुस्तके वाचलेली आणि चार पुस्तके लिहिलेली लेखिका. समाजमाध्यमातून संपर्कात आलेली. खूप हुशार, समजदार, अनेक कलागुणांना अंगी बाळगून असलेली मैत्रीण. मताधिकार वापरू शकतो म्हणजे तरुण असलेल्या एका मुलाची आई. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून पाच सहा वर्षांपासून कायदेशीर वेगळी झालेली. चारेक वर्षांपूर्वी शांत जीवनाच्या शोधात एका महिन्यासाठी तीने (भिक्खू) श्रामणेरी दीक्षा घेतली होती. त्याच दरम्यान तिच्यापेक्षा 6/7 वर्षे वयाने लहान, अविवाहित उच्च शिक्षित तरुण श्रामणेर तिच्या संपर्कात आला. विश्वास, प्रेम आणि नंतरच्या काळात त्यांनी लग्न केले. ती सर्वसामान्य जीवन जगत आहे तर तो अजूनही चिवर धारण करून आहे. जेव्हा त्याला तिला भेटायला यायचं असते तेव्हा तो सर्वसामान्य कपडे घालून येतो. मला कायम वाटतं की तो ज्या बुद्ध धम्म परंपरेला मानतो म्हणजे चिवर धारण केले आहे आणि त्या पवित्र वस्त्राचा अपमान करतो याचा अर्थ तो तिलाही धोका देत असावा. पण एक दिवस चर्चा सुरू असताना ती म्हणाली की, बाया काही कमी नसतात, त्यांनी चिवर घातले पण देखणे तरुण आहेत म्हणून काही बाया स्वताहून त्यांना व्हिडिओवर आपले शरीर उघडे करून दाखवतात. मला वाटलं त्याने असेच सांगितले असेल तर ती म्हणाली की तिने स्वता त्याच्या मोबाईल मध्ये त्या बायांचे स्क्रीनशॉट बघितले. त्याने तिला दाखवण्यासाठी ठेवले होते म्हणे. तिच्या बोलण्याने मला वाईट नाही तर तिच्या विचाराची कीव आली. एवढी शिकलेली, लेखिका कवयित्री आणि ती म्हणते, ' चिवर जरी अंगावर असलं तरी आहे तर तो पुरुष, शारीरिक गरज,  लैंगिक भावना आहेत त्याला...
-------
तुम्हालाही असे अनुभव आणि त्यामुळे मनात निर्माण आहेतच..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा