१४ ऑक्टोबर १९५६ अशोकाविजयादशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो शोषित, पिडित अस्पृश्य बांधवांना विषमतेवर आधारित ब्राह्मणीधर्मातून बाहेर काढून समानतेवर आधारित बौद्ध धम्माची दिक्षा दिली. त्यांनी धम्मदिक्षेसोबत २२ प्रतिज्ञा दिल्या. तेव्हाच्या शोषित, पिडित अस्पृश्य बांधवांनी या बदलाचा स्विकार सुद्धा केला. २२ प्रतिज्ञांचे पालन करण्यासाठी आपल्या घरातील दगड-धोंड्याचे देव फेकून दिले, स्वतः अशिक्षित असले तरि या पिडित समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले तत्त्व “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” आत्मसात केले. आपल्या मुलांना शिक्षण दिले, त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सहन केले, मोलमजुरी केली पण मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिली. तसेच अन्न, वस्त्र निवारा या मुलभुत अधिकारासोबत शिक्षणाचा सुद्धा अधिकार दिला. शिक्षणामध्ये फि माफी, शिष्यवृत्ती मिळाली. शिक्षण मिळाले, नोकर्या सुद्धा मिळाल्या, काहींनी व्यवसाय केले, अशा विविध मार्गाने या शिक्षित लोकांकडे आर्थिक सुबत्ता आली. ब्राह्मणी धर्मव्यवस्थेने ज्यांना समाजात चपलेचे स्थान दिले होते, त्यांना या धर्मांतरामुळे सन्मानाचा जिवनमार्ग मिळाला.
ज्या लोकांनी त्यावेळी बाबासाहेबांचे विचार समजून घेतले त्यांच्या या पिढीमध्ये आज हे बदल दिसुन येतात, परंतु अजुनही बहुसंख्य समाज हा अज्ञान, अंधकाराच्या धार्मिक गुलामगिरित खितपत पडलेला आहे. खरे तर या लोकांना विकासाच्या वाटेवर आणण्याची जबाबदारी ही समाजातील सुशिक्षित वर्गाची आहे, परंतु ते ती टाळत आहेत. आता तर समाजातील काही श्रीमंत लोकांना वाटायला लागले आहे कि, आपण या बौद्ध समाजात का जन्माला आलो? त्यांचा स्वतःशीच संघर्ष सुरु आहे. आपल्या जबाबदारीपासून ते नुसतेच दुर जात नाहीत, तर त्यांनी समाजात आपला एक वेगळा वर्ग बनवायला सुरवात केली आहे हे दिसुन येते. आपल्या समाज बांधवापासून आपण वेगळे आहोत हे ते सतत दाखवत असतात. श्रीमंत बौद्धांच्या घरी घरकाम करायला येणारी व्यक्ती “आपलीच” आहे, हे विसरुन ते तिला तुच्छ वागणुक देतात. मग परिस्थिती बदलविण्यासाठी प्रयत्न करणे तर खुप लांब.
तथागत बुद्धाच्या काळात भिक्षुसंघामध्ये ७५% ब्राह्मण आणि २५% शुद्रातिशुद्र भिक्षु होते, परंतु बौद्ध धम्म हा अथांग सागराप्रमाणे आहे, हि बुद्धाची शिकवण होती. ज्याप्रमाणे कोणतीही नदी सागरात आल्यानंतर तिचे अस्तित्व राहत नाही, तर ती सागर म्हणुनच ओळखली जाते. त्याचप्रमाणे बौद्ध धम्मात आल्यानंतर “जात” अस्तित्वात राहत नाही, असे बाबासाहेबांनी आपल्या १४ ऑक्टोबर १९५६ च्या भाषणात सांगितले होते. पण आज बौद्धांची ओळख विशिष्ट जातीचे लोकं म्हणुन झालेली दिसुन येते.
आज बौद्ध समाजातील काही लोकांकडे गरजेपेक्षा कितीतरी पट जास्त पैसा आला, त्यामुळे त्यांना या पैश्याचे काय करायचे हेच समजत नाही. त्यांना त्यांची आर्थिक संपन्नता हि हिंदू देव देवतांमुळे मिळाली असे वाटते. हे लोकं समाजापसून आपली ओळख लपवून ठेवतात. आपण जगातील सर्वात आदर्श अशा बौद्ध धम्मात जन्मलो हे सांगायची सुद्धा यांना लाज वाटते. फक्त जन्माने बौद्ध पण कर्माने हे लोकं ब्राह्मणवादी मानसिकतेची ओळख करुन देतात. अशा या ब्राह्मणवादी मानसिकतेचे दर्शन ब्राह्मणी उत्सव साजरे करुन हे लोकं देत असतात.
विदर्भात ज्या बौद्धांच्या घरी दिवाळी किंवा ब्राह्मणी सन साजरे केले जाते त्यांना “घमळे” असे म्हणतात. त्यामुळे तेथे दिवाळी साजरी करणार्या बौद्धाचे प्रमाण कमी असावे, छुप्या स्वरुपात असे उत्सव साजरे होत असतात, यात शंका नाही. परंतु सामाजिक जीवनात सक्रिय असणार्यांच्या घरात हे घडत नाही, हे नक्की. त्यामुळे मी विदर्भात बौद्धांच्या घरी वा वस्तीत मोठ्या उत्साहात साजरी होणारी दिवाळी पाहिली नव्हती, फार तर काय, कुणी मैत्रिणींनी काही आणले तर खायला मिळायचे. परंतु काल पुण्यात जी दिवाळी मी अनुभवली, ती अवर्णनिय. नेहमीप्रमाणे काम आटोपून संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आम्ही कार्यालयातुन बाहेर पडलो. ज्या परिसरात म्हणजे पुण्यामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीमध्ये मी कार्यालय शोधत होते, महत्प्रयासाने तेथे मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे या वसाहतीची जागा १९४८ मध्ये मिळाली आहे. साहजिकच या परिसराबद्दल आपुलकी आहे, नियमानुसार या सोसायटीमध्ये फक्त श्येड्युल कास्टचाच व्यक्ती घर विकत घेवू शकतो. सगळे बौद्ध लोकं इथे राहतात, पुण्यामध्ये मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित बौद्ध या सोसायटीमध्ये राहतात. या ठिकाणी कोणतेही ब्राम्हणी उत्सव साजरे होत नसावे, हा माझा समज. म्हणजे गोड गैरसमज. थोड्या दिवसांपुर्वी याच वसाहतीत एका घरी गणपती बसला त्यावेळी थोडा गैरसमज दुर झाला. नवरात्रीमध्ये सुद्धा नऊ दिवस काही महिला आणि मुली अनवाणी चालतांना दिसल्या. उरलासुरला गैरसमज काल दुर झाला. आम्ही घरी जायला निघालो आणि सोसायटीमध्ये सुरु असलेली दिवाळी पाहून थक्क झालो. या सोसायटीमध्ये बर्याच घरात कालपर्यंत स्वयंपाकघरातील एका कोपर्यात लपलेले ब्राह्मणी देव आता हॉलमध्ये व दरवाज्यावर ठळकपणे दिसून येतात, काही परिवार चर्चमध्ये जातात असेही सांगितले जाते.
डॉ. आंबेडकर सोसायटीतील ही दिवाळी पाहुन समाधान झाले नाही म्हणून शहरातील अजून काही बौद्ध वस्त्यांमध्ये फेरफटका मारला आणि दिवाळी साजरी होतांना पाहिली. जे-जे स्वतःला बौद्ध म्हणवून मिरवत असतात, ते आनंदाने दिवाळीचे फटाके उडवत होते. घरासमोर पणत्या, आकाशकंदिल, इलेक्ट्रिक दिव्यांचे तोरण, मोठमोठ्या रांगोळ्या असे चित्र सगळीकडे होते. जे लोकं इतरांना धम्माचे ज्ञान देत असतात, बौद्ध धम्माचे तत्वज्ञान सामान्यजनांना शिकवत असतात, त्यांची सुद्धा दिवाळी काल पाहिली. ते सुद्धा या दिवाळीच्या आंनदोत्सवात मग्न झालेले दिसले. क्षणभर तर मलाच अपराधी असल्यासारखे वाटले, सगळ्यांची दिवाळी पाहत आम्ही रात्री दहा वाजताच्या दरम्यान घरी पोहचलो. माहेरी आईला फोन केला. ती नुकतीच विहारातून परतली होती. घरी जेवण काय बनविले याची चौकशी केली. दरवर्षी प्रमाणे घरी दिवाळी नव्हती रोजचे साधे जेवण बनले होते. मनाला जरा बरे वाटले....
माझा अस्वस्थपणा मला शांत बसू देत नाही. डॉ. आंबेडकरांच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या सोसायटीमध्ये असे घडावे का? शिकलेले लोकं असे का वागतात? हा प्रश्न मला सारखा भेडसावत आहे. याच वसाहतीतील एका श्रीमंत स्त्रीने माझ्या सामाजिक कार्यासाठी पैसे देवून सुद्धा कार्यालयासाठी जागा दिली नाही. कारण माझ्याकडे शेजारच्या झोपडपट्टीतील लोकं येणारं. हे तिने स्पष्ट बोलुन दाखविले होते. ती स्वतः झोपडपट्टीमधून आलेली आहे, तरी एवढा आकस का? खुप वेळा यावर विचार केला. का शिकलेले बौद्ध असे वागतात? धर्म-कर्मकांडाच्या नावाखाली फुले-शाहु-आंबेडकरांकडे का पाठ फिरवतात? वाटले आपणच जबाबदार आहोत. स्वतःला बौद्धांच्या म्हणविणार्या संस्था संघटना अश्यावेळी कुठेच दिसत नाहीत. या बौद्ध संस्था संघटना पर्याय देण्यासाठी का पुढे येत नाहीत. थोड्याफार संघटना आहेत पण त्यांची शक्ती कमी पडते.
बौद्धांमध्ये स्वतःचा वेगळा वर्ग बनविलेल्या लोकांना ब्राह्मणी कर्म-कांडांचे, सणाचे आकर्षण आहे. आवश्यकतेपेक्षा खुप जास्त पैसा आल्यामुळे तो पैसा खर्च करणारे उत्सव या लोकांना पाहिजेत. दिवाळीपुर्वी धम्मचक्र प्रवर्तन दिवस येतो मग तेव्हा असे कार्यक्रम साजरे करु शकतो, जर रोषणाई करायची तर तेव्हा का नाही? काही लोकं सांगतात कि, शेजारी खायला बनवतात मग लहान मुलांसाठी बनवावे लागते, आपण जर धम्मचक्र प्रवर्तन दिवसाला खाण्यासाठी हे पदार्थ जे दिवाळीत बनवितो ते बनविले आणि मुलांना दिले तर, आणि जर त्यांना या उत्सवामागच्या कथा सांगितल्या तर नक्किच मुले समजुन घेतील. मुस्लिम, ख्रिच्छन,बोहरी हे दिवाळीच्या वेळी काम करतात! काय ते आपला धर्म सोडून ब्राह्मणी धर्मातील देवी देवतांना पूजतात ? काय ब्राह्मणी सण साजरे करतात?
काही बौद्ध लोकं दिवाळीतील धम्मशिबीराला जातात. हे खुप अभिनंदनीय आहे. पण अशा शिबीरांची व शिबीरांना जाणार्यांची संख्या फार कमी आहे. काल बौद्ध विहाराजवळ असणार्या घरांमध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी होत होती, विहारात बसून भिक्खु हे सगळे पाहत होते. जर भिक्खुंनी समाजामध्ये जाणीव जागृतीचे काम केले तर त्यांना असे बौद्ध घरात साजरे होणारे ब्राह्मणी उत्सव पाहत बसावे लागणार नाही. सगळे घडून गेल्यावर नंतर मनस्ताप करण्यापेक्षा आजच यावर गांभिर्याने विचार करून कृतीकार्यक्रम आखले पाहिजे. आपल्या घरातून सुरवात करुया!
Chintaniy.....
उत्तर द्याहटवाआजही कायम आहे परीस्थिती
हटवा