दैनंदिन वर्तमानपत्र वाचत असतांना एखादी तरी आत्महत्येची बातमी आपण वाचत असतो. कधी फक्त त्यावर नुसतीच नजर टाकतो, तर कधी वाचतो. वाचल्यावर आपण त्याबद्दल हळहळ व्यक्त करायला विसरत नाही. काही वेळा ही आत्महत्या सामुहिक स्वरुपाची असते, अश्या वेळी बरिच चर्चा वेगवेगळ्या गटात होत असते. “एखाद्या व्यक्तीने आपले आयुष्य स्वत:च्या हाताने संपविणे म्हणजे आत्महत्या”, अशी आत्महत्येची सर्वसाधारण व्याख्या मानली जाते. बहुतांश आत्महत्या या मानसिक दडपणातून वा तणावामुळे घडतात, असे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून दिसून येते. कधी या आत्महत्येची कारणे काय? याची उत्तरे देऊन जातात, तर कधी अनेक अनुत्तरित प्रश्ने देऊन जातात.
“जिवन जगायला धाडस लागते, मरायला नाही” अशी तत्त्वज्ञानसूचक वाक्ये आपण नेहमीच ऐकत/वाचत असतो, परंतु अशा आत्महत्येच्या बातम्या वाचल्या तर, हा प्रश्न विचार करायला भाग पाडतो कि, काय खरेच मरायला, आपले आयुष्य आपल्याच हाताने निष्ठुरपणे संपवायला धाडस लागत नाही? जगणे असो किंवा मरणे धाडस लागतेच. थोडेसे जरी कुठे लागले, खरचटले अथवा भाजले की आपण तडफडायला लागतो. आपल्या आप्तेष्टांचे अंतिम दर्शन घेतांना नकळत आपले डोळे भरुन येतात; ते फक्त यासाठी नव्हे कि ती व्यक्ती आता आपल्यात नसणार; त्यावेळी क्षणभर आपण आपली अंत्ययात्रा पण एक दिवस अशीच जाणार हा विचार करतो. मृत्यू हे जरी सत्य असले तरी आपण सतत त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. मग तरीसुद्धा आपले आयुष्य संपविण्याचा टोकाचा निर्णय एखादी व्यक्ती का घेत असावी? धाडस असल्याशिवाय असे पाऊल कुणी उचलु शकते, असे वाटत नाही. आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे, तरिही आत्महत्या होतात. मात्र आत्महत्या करण्यास भाग पाडणार्या कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीचे काय? त्यांना कोण शिक्षा करणार?
जवळपास १४-१५ वर्षापुर्वीची अशाच एका सामुहिक आत्महत्येने मला बरेच प्रश्न पडले होते. ते अजुनही अनुत्तरित आहेत. अमरावती जिल्ह्यातील अकोले गावातील तिघी तरुण मैत्रीणींनी एका ओढणीमध्ये स्वत:ला बांधून विहिरित जीव दिला. बहुतांश सगळ्याच वर्तमानपत्राने ही बातमी पहिल्याच पानावर छापली होती. मला आजही ही घटना लक्षात राहण्याचे विशेष कारण आहे. त्या मुलींपैकी एकीचे दोन दिवसांपुर्वी मोठ्या थाटात लग्न झाले होते. त्या लग्नाला आम्ही सहपरिवार हजर होतो. लग्नविधीनंतर आम्ही वरातीसह अमरावतीला परत आलो. ती सुद्धा सोबत होती. दुसर्या दिवशी ती रितीरिवाजानुसार नवरी परतीच्या वरातीसोबत आपल्या माहेरी गेली. तिला सासरी परत आणण्यासाठी (लग्नानंतर) तिसर्या दिवशी मोठी मंडळी तिच्या माहेरी गेली. दुपारी पाहुणे आपल्या नविन सुनेबद्दल विचारु लागले.
तेव्हा ती आपल्या मैत्रीणीकडे गेल्याचे समजले. पाहुणचार आटोपल्यावर आता परत जाण्याची वेळ झाली तरी नवरी परत आली नाही. मग तिचा भाऊ तिला बोलावून आणण्यासाठी गेला. तो सगळ्या मैत्रीणीकडे जावून परत आला. ती आणि तिच्या दोन जिवलग मैत्रिणी गावात नव्हत्या. तिचा परिवार खुप घाबरला. पाहुणे घरात त्यात नविन सोयरे काय म्हणणार? पाहुण्यांना सगळे कळले. ते सुद्धा काळजीत पडले. शोधाशोध सुरु झाली. रात्री दोन वाजताच्या दरम्यान गावाबाहेरच्या शेतातील विहिरित त्या तिघी सापडल्या, मात्र मृतावस्थेत......... त्या तीन जिवलग मैत्रिणींनी सोबतच आपला जिवन प्रवास संपविला होता. एकाच ओढणीत त्या तिघींनी एकमेकिंना बांधून विहिरित आत्महत्या केली होती.
सर्वांनी हळहळ व्यक्त केली, कुणी टिका केली, नवर्या तरुणीवर विशेष टिका झाली. कारण जर तिला मरायचे होते तर मग तिने वडिलांचा एवढा खर्च का होऊ दिला…………? चौकशीअंती माहिती मिळाली कि त्या तिघी कुणा साधुच्या संपर्कात होत्या, आणि त्याच्या सल्ल्याने त्यांनी हे पाऊल उचलले होते म्हणतात. परंतु हे कारण फारसे कुणाला पटले नव्हते आणि या व्यतिरिक्त दुसरे कारण कधी कळलेच नाही. नातेवाईकांनी शोक व्यक्त केला. मरणानंतरचे धार्मिक विधी पार पडले. कालांतराने या घटनेला लोकं विसरुन गेलेत, संपले सगळेच........... त्यांनी असे का केले?
काल-परवा पुन्हा एका आत्महत्येने मला बेचैन केले, फक्त वर्तमानपत्रात ती बातमी वाचली असती तर मी कदाचित विसरले असते. पण मी त्या मुलीचा अपमान, तिचे विटंबन असे सहज विसरु शकणार नाही. ती मला माझी जवळची कुणीतरी वाटली, कदाचित माझ्यासोबत असे झाले असते तर.......... दसर्याच्या दोन दिवसापुर्वी जळगाव जिल्ह्यातील एका गावातील १९ वर्षीय तरुणीने आपल्या घरी पेटवुन घेतले. त्यात ती ९०-९५ टक्के भाजली आणि तीन दिवसानंतर तिचा मृत्यु झाला. कारण होते मानसिक दडपण. गेले काही दिवस ती रात्री बडबड करायची. नातेवाईकांच्या मते तिला भुतबाधा झाली होती. वर्तमानपत्रात वाचले असते तर अंधश्रद्धेतुन घडले म्हणुन हळहळ व्यक्त करण्यापलीकडे दुसरे काही केले नसते. परंतु तिच्या काकाचा मुलगा म्हणजे तिच्या भावाने सांगितलेली हकिकत ऐकून धक्काच बसला. या मुलीला मानसिक दडपण होते परंतु ते देणारे दुसरं कुणी नाही तर तिची आई आणि तिचे जवळचे नातेवाईक होते. कारण खुप मोठे होते असे नाही, तिने काही गुन्हा सुद्धा केला नव्हता. चुकी कुणाची असेल तर तिला जन्म देणार्याची. कारण तिला गर्भपिशवी नव्हती. साहजिकच तिच्याशी कुणी लग्न करणार नाही आणि ती आई होवू शकणार नाही या कारणासाठी ही मंडळी तिला खुप मानसिक त्रास द्यायची. दहावीनंतर गेले दोन वर्षे ती घरातच होती. असे म्हणतात की, जगात कुणाला आपले दु:ख कळो अगर न कळो आपल्या आईला ते कळते, कारण तिच्याशी आपली नाळ जोडलेली असते आणि आपण तिचे अंग असतो..............
मग तिची आई का तिला समजु शकली नाही? अज्ञान म्हणावे तर अज्ञानामुळे आईचे प्रेम त्यामुळे कमी होवू शकते काय? हा प्रश्नच. लहान असतांना एकदा मांजरीला तिच्या पिल्लाला तोंडात उचलून नेतांना पाहुन ओरडले होते, तेव्हा कळले की, मांजरीचे दात कधीच तिच्या पिल्लांना लागत नाही. आई म्हणजे कधीही आपल्या बाळाला इजा न होऊ देणारे सुरक्षाकवच, परंतु हे सदासर्वकाळ सत्य ठरत नाही.........
आई अशी वागली तर समाज तरी कुठे तिला सोडणार? ९५% जळालेल्या त्या मुलीला तिचा हा भाऊ, आणि इतर दोन लोकं सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. तेथे सुद्धा वेळेवर तिच्यावर उपचार झाला नाही. त्याने आपल्या संपर्कातील काही मोठ्या लोकांना फोन लावला. तरी सुद्धा तीन तासानंतर त्या जळालेल्या मुलीला डॉक्टरांनी हात लावला, वरुन सल्ला “९५% जळालेली आहे, ९५% म्हणजे माहित आहे ना?” काय म्हणावे या मानसिकतेला. मरतांनासुद्धा ती क्षणभर जगु शकली नाही, किती हे एका जिवाचे विटंबन. शेवटी जे व्हायचे ते झाले. चार दिवसांनी तिची प्राणज्योत मालवली. तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
सध्या तिच्या घरात दुखवटा (सुतक) पाळले जात आहे. सगळे धार्मिक विधी कर्मकांड पुर्ण केले जात आहेत. पुढल्या वर्षी कावळ्याच्या रुपात तिला जेवू घालायला हे लोक विसरणार नाही, ही शिकवन कोण देतो ? जन्माला आलेल्या जिवाला त्याचे आयुष्य जगणे नको करायचे आणि मेल्यावर त्याला दरवर्षी फक्त एकच दिवस आठवायचे. किती अमाणुष वागणुक आहे, ती सुद्धा भुतबाधेच्या नावावर. ज्यांनी तिला त्रास दिला त्यांना महित आहे कि, तेच जबाबदार आहेत तिच्या आत्महत्येला. परंतु ते मान्य करणार नाहीत. कधीच नाही. त्यांनी केलेल्या हत्येला ते भुतबाधेच्या नावाखाली मुठमाती देणार, जर तिला भुत लागले होते तर तिचे सुद्धा भुत या लोकांना का लागत नाही ? याला आत्महत्या म्हणणार की, अंधश्रद्धेने घेतलेला बळी? अंधश्रद्धाळूंनी घडवून आणलेली हत्या ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा