आठवणी जाग्या झाल्या तर काल परवाची गोष्ट अन काळाच्या संदर्भात बोलायचं तर तब्बल पंधरा वर्षे...
तश्या आम्ही खुप खास मैत्रिणी. कुठेही दोघीच सोबत दिसायचो. कॉलेजच्या सुट्ट्यांचे दिवस सुद्धा आम्ही एकमेकींना पत्र लिहून सतत संपर्कात रहायचो. तिच्या वाढदिवसाला गिफ्ट माझेच अन पहिला फोनही माझाच, तो ही शेजारच्या लँडलाईन वर.
कालांतराने थोड़ा बदल झाला. आम्ही पदवीचे शिक्षण घेत असतानाच ती एका मुलाच्या प्रेमात पडली. एवढ्या हुशार मुलीला धड दहावीत पास न होणारा, दारू पिणारा मुलगा आवडावा. तेही माझ्या सख्ख्या मैत्रिणीला😥. खुप वाईट वाटलं. पण पर्याय नव्हता. मैत्री तोडली तर कदाचित तीची वाट लागेल ही भिती. आता माझ्या ऐवजी त्याच्या पत्राची आणी भेटीची ती वाट पाहू लागली होती.
आम्ही एकाच वयाच्या तरी माझी समज माझ्या घरच्या वातावरणाची निर्मिती म्हणावी लागेल. आईकडे आजुबाजुच्या बायका आपली गार्हानी / घरच्या तक्रारी घेवुन यायच्या. (एम एस डब्लू ला आल्यावर समजले ते आईचे काउंसलिंग सेंटर होते, मोफत सल्ला केंद्र. आईकडे येनारया बाया अन आईचे सल्ले.. सोबत ठरलेले वाक्य यासाठी चांगले शिका लागते, शिक्षण आणि इज्जत खुप महत्वाची.)
माझी मैत्रीण जेव्हा म्हणाली की आता 18 वर्षे पुर्ण झाली की लग्न करणार, तेव्हा मला धक्काच बसला. कारण आजुबाजुच्या समस्या या अश्याच लवकर लग्न अन मुले यामूळेच. खुप समजावले, शेवटी म्हटलं की मी स्वता येईल कोर्टात सही द्यायला पण आता नाही. निदान तो नाही तर तू तरी शिकलीच पाहिजे, नाहितर मी आणि बाकीचे सगळे शिकलेले, चांगल नाव असणार आणी तू काय करशील? हळूहळू तिच्याही लक्षात आलं. निदान भवितव्याच्या दृष्टीने विचार करुन शिक्षण महत्वाचं. मात्र ती ठाम, कितीही शिकली तरी लग्न याच्याशी करेल. शेवटी पहिल प्रेम. (या वयातल प्रेम म्हणजे अंधश्रद्धा😁😁 खात्री)
नंतर अजुन सहा वर्षे ती शिकत होती. यादरम्यान माझे क्षेत्र बदलले आणी शहर सुद्धा. तरिही आम्ही सम्पर्कात होतो. विशेष म्हणजे मी स्वता तिच्या सम्पर्कात राहिली. ती भविष्यात आर्थिकदृष्ट्या विसंबून असू नये, चांगले जिवन जगली पाहिजे यासाठी माझी धडपड.
ती शिकली, तिला समजले की ते फक्त आकर्षण होते, साहजिकच ते कमी झाले. त्याचा स्वभाव तिला समजला आणी प्रेम बीम ठीक पण लग्न नाही करायला पाहिजे. तिच्या घरच्यांच्या पेक्षा माझा राग. पहिला नाट मी लावला होता म्हणुन...
ती नोकरी करायला लागली. निर्णय बदलला.
शिक्षणाने समज वाढली आणी हळूहळू माझी गरज संपली. आता माझ्यामुळे काही अडत नव्हतेच. माझा नियम मी पाळला, जर आपल्यामुळं पुढच्या व्यक्तीचे काही अडत नसेल तर उगाच जागा अडवून ठेवू नये. नातं रक्ताचे असो वा मैत्रीचे नाहितर कामाचं ठिकाण जेव्हा आपली गरज नाही असं वाटतं तेव्हा तिथे उगाच थांबुन समोरच्याना जबरदस्तीने सोबत का द्यावी?
...
...
...