पावसाळा सुरू झाला की कुत्र्याच्या छत्र्या आणि टेकू बऱ्यापैकी सर्वत्र दिसतात. जसजशी माहितीत भर पडली तेव्हा कळले कुत्र्याची छत्री नव्हे तर इंग्रजीतील मशरूम आहेत! या पावसात वाढतात व काही दिवसात संपतात. आणि टेकू? सांगते! घरी आई कारले, वाल अशी वेल लावित असे. बिया पेरल्या, कोंब आले, पाने फुटली कि त्यांना लगेच 'टेकू'च्या सहय्याने तो वेल मांडवावर पोहचवला जाई. लहानपणी या कुत्र्याच्या छत्र्या व टेकू यांचे फार कौतूक वाटायचे.
हा 'टेकू' जोपर्यंत तो वेल मांडवावर व्यवस्थित जात नाही तोपर्यंत या 'टेकू'चे फार महत्व. त्याची वेल वर जाईपर्यंत विशेष काळजी पण घेतली जायची. पण एकदा का वेल वर मांडवावर पोहोचला रे पोहचला आणि त्याला टेकूची गरज नाही, असे दिसले की मग त्याच्याकडे कुणाचे फारसे लक्ष जात नसे. 'टेकू' कधी 'पडला' हे ही कधी कधी समजत नव्हते!
असे असले तरी 'टेकू' फार महत्त्वाचा. वादळी वारे वा जोरदार पावसाने जेव्हा रोपटी वा फांद्या तुटल्या जातात तेव्हा हे टेकू मदतीला असतात. एखाद्याचे घराचे छत कमजोर झाले, पडायला आले तर मजबूत बल्ली किंवा मेढ 'टेकू' म्हणून वापरतात. या बल्लीला म्हणजे 'टेकू'ला कोणी टेकून राहणे तर दूरच पण त्याच्या जवळ ही भटकत नाही. घराला झाडून साफ करताना वा सारवन करताना सुद्धा किती या 'टेकू'ची काळजी!
घराच्या बाबतीत मात्र या 'टेकू'ला जरा जास्त महत्त्व दिले जाते. पडके घर आणि टेकू यांचे नाते अतूट. 'टेकू' काढला तर घर पूर्ण पडेल. मग घर पडले तर काय? टेकू आपोआपच निकामी!
खरे तर 'टेकू' म्हणजे 'आधार' असा सरळ अर्थ आहे. पण मानवी वृत्तीचा विचार करता अनेक प्रकारचे 'मानवी टेकू' दिसून येतात. जसे पावसाळ्यात वेलींना व पडक्या घराला टेकू खूप महत्वाचा तसे काही टेकू राजकीय वा सामाजिक जीवनात देखील भेटत असतात.
'राजकीय युती' ही कमजोर छपराला असलेल्या 'टेकू'ची आठवण करुन देते. कधी युती तुटेल म्हणून दोघेही गट एकमेकाना बिल्कुल दुखावणार नाहीत! अशा युतीत मन रमविणाऱ्या काही टेकूना सतत वाटत असतं कि आपण खूप महत्त्वाचं काम करीत आहोत. त्यामुळे जिथे कुठे कमकुवतपणा दिसला तिथे जाऊन टेकूची भूमिका घेऊन आपला मोठेपणा सिद्ध करायचा प्रयत्न करतात. पण जसं 'ओझं' होतंय असं दिसले कि लगेच काढता पाय घेतात. असो.
काही टेकू भल्यासारखे असतात. स्वतःचा उपयोग दुसऱ्याला शिडी सारखा करतात. काही मजबूत खांबासारखे असतात, जुन्या कमजोर झालेल्या खांबाची जागा घेतात छत टिकवून ठेवतात! एखाद्या झाडाच्या फांद्या मोठ्या झाल्या त्या तुटू नये, झाड पडू नये म्हणून त्या फांद्यांना देखील टेकू लावतात! सामाजिक संगठना मध्ये असे टेकू देखील आवश्यक ठरतात. 'टेकू'त जर क्षमता असेल आणि त्या आधाराने काही भले होणार असेल तर मनुष्य प्राण्याने असा 'टेकू' बनणे चांगले! निश्चित बनावे. पण नेहमी स्वतःला टेकू बनवत राहण्यात काही अर्थ नाही. आणि कायम टेकू च्या आधारावर दिवस काढणे पण ठीक नाही. कारण टेकू म्हणजे केवळ निर्जीव आधार.
मला वाटते जर सजीव आहोत तर मोठे 'झाड'च बनले पाहिजे! असे झाड ज्याच्या अंगा खांद्यावर पक्षी व प्राणी खेळतात, फुले-फळे चाखतात, विसावा घेतात! हेच पक्षी प्राणी त्या झाडाच्या बिया पसरवतात. झाडाच्या फांद्यांवर प्राणी पक्षीच नाही तर प्रसंगी परजीवी वेली देखील मोठ्या होतात. पण कालांतराने त्या संपून जातात. असो.
पण झाड हे झाड राहते. या झाडाचे आयुष्य संपले म्हणजे ते 'निर्जीव' झाले कि त्याचे लाकूड इमारतीला, उद्योग अवजारांना व काही 'टेकू' म्हणून तर काही सरपण! हे साहजिकच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा