गुरुवार, २४ जून, २०२१

टेकू आणि झाड



पावसाळा सुरू झाला की कुत्र्याच्या छत्र्या आणि टेकू बऱ्यापैकी सर्वत्र दिसतात. जसजशी माहितीत भर पडली तेव्हा कळले कुत्र्याची छत्री नव्हे तर इंग्रजीतील मशरूम आहेत! या पावसात वाढतात व काही दिवसात संपतात. आणि टेकू? सांगते! घरी आई कारले, वाल अशी वेल लावित असे. बिया पेरल्या, कोंब आले, पाने फुटली कि त्यांना लगेच 'टेकू'च्या सहय्याने तो वेल मांडवावर पोहचवला जाई. लहानपणी या कुत्र्याच्या छत्र्या व टेकू यांचे फार कौतूक वाटायचे.  

हा 'टेकू' जोपर्यंत तो वेल मांडवावर व्यवस्थित जात नाही तोपर्यंत या 'टेकू'चे फार महत्व. त्याची वेल वर जाईपर्यंत विशेष काळजी पण घेतली जायची. पण एकदा का वेल वर मांडवावर पोहोचला रे पोहचला आणि त्याला टेकूची गरज नाही, असे दिसले की मग त्याच्याकडे कुणाचे फारसे लक्ष जात नसे. 'टेकू' कधी 'पडला' हे ही कधी कधी समजत नव्हते!
 
असे असले तरी 'टेकू' फार महत्त्वाचा. वादळी वारे वा जोरदार पावसाने जेव्हा रोपटी वा फांद्या तुटल्या जातात तेव्हा हे टेकू मदतीला असतात. एखाद्याचे घराचे छत कमजोर झाले, पडायला आले तर मजबूत बल्ली किंवा मेढ 'टेकू' म्हणून वापरतात. या बल्लीला म्हणजे 'टेकू'ला कोणी टेकून राहणे तर दूरच पण त्याच्या जवळ ही भटकत नाही. घराला झाडून साफ करताना वा सारवन करताना सुद्धा किती या 'टेकू'ची काळजी! 

घराच्या बाबतीत मात्र या 'टेकू'ला जरा जास्त महत्त्व दिले जाते. पडके घर आणि टेकू यांचे नाते अतूट. 'टेकू' काढला तर घर पूर्ण पडेल. मग घर पडले तर काय? टेकू आपोआपच निकामी! 

खरे तर 'टेकू' म्हणजे 'आधार' असा सरळ अर्थ आहे. पण मानवी वृत्तीचा विचार करता अनेक प्रकारचे 'मानवी टेकू' दिसून येतात. जसे पावसाळ्यात वेलींना व पडक्या घराला टेकू खूप महत्वाचा तसे काही टेकू राजकीय वा सामाजिक जीवनात देखील भेटत असतात. 

'राजकीय युती' ही कमजोर छपराला असलेल्या 'टेकू'ची आठवण करुन देते. कधी युती तुटेल म्हणून दोघेही गट एकमेकाना बिल्कुल दुखावणार नाहीत! अशा युतीत मन रमविणाऱ्या काही टेकूना सतत वाटत असतं कि आपण खूप महत्त्वाचं काम करीत आहोत. त्यामुळे जिथे कुठे कमकुवतपणा दिसला तिथे जाऊन टेकूची भूमिका घेऊन आपला मोठेपणा सिद्ध करायचा प्रयत्न करतात. पण जसं 'ओझं' होतंय असं दिसले कि लगेच काढता पाय घेतात. असो.

काही टेकू भल्यासारखे असतात. स्वतःचा उपयोग दुसऱ्याला शिडी सारखा करतात. काही मजबूत खांबासारखे असतात, जुन्या कमजोर झालेल्या खांबाची जागा घेतात छत टिकवून ठेवतात! एखाद्या झाडाच्या फांद्या मोठ्या झाल्या त्या तुटू नये, झाड पडू नये म्हणून त्या फांद्यांना देखील टेकू लावतात! सामाजिक संगठना मध्ये असे टेकू देखील आवश्यक ठरतात. 'टेकू'त जर क्षमता असेल आणि त्या आधाराने काही भले होणार असेल तर मनुष्य प्राण्याने असा 'टेकू' बनणे चांगले! निश्चित बनावे. पण नेहमी स्वतःला टेकू बनवत राहण्यात काही अर्थ नाही. आणि कायम टेकू च्या आधारावर दिवस काढणे पण ठीक नाही. कारण टेकू म्हणजे केवळ निर्जीव आधार. 

मला वाटते जर सजीव आहोत तर मोठे 'झाड'च बनले पाहिजे! असे झाड ज्याच्या अंगा खांद्यावर पक्षी व प्राणी खेळतात, फुले-फळे चाखतात, विसावा घेतात! हेच पक्षी प्राणी त्या झाडाच्या बिया पसरवतात. झाडाच्या फांद्यांवर प्राणी पक्षीच नाही तर प्रसंगी परजीवी वेली देखील मोठ्या होतात. पण कालांतराने त्या संपून जातात. असो. 

पण झाड हे झाड राहते. या झाडाचे आयुष्य संपले म्हणजे ते 'निर्जीव' झाले कि त्याचे लाकूड इमारतीला, उद्योग अवजारांना व काही 'टेकू' म्हणून तर काही सरपण! हे साहजिकच आहे.

सोमवार, २१ जून, २०२१

बालसन्गोपनाचे किस्से

===

लवकरच गाथा चार वर्षांची होईल. जवळपास गेले वर्षभर आठवडा-दोन-आठवड्यात का होईना पण किमान एक तरी व्यक्ती अशी असतेच जी तिच्या शाळेबद्दल चौकशी करते. अजून शाळेत नाव नाही घातले (टाकले) म्हटल्यावर निदान ऑनलाइन क्लासला तरी बसवायला पाहिजे असा सल्ला आवर्जून असतो. सर्वच पालकांना आपल्या पाल्यांच्या बाबतीत काळजी आहे. लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते. त्यापोटी नेहमी आम्हाला गाथाबद्दल सूचना व मार्गदर्शन मिळत असते. गाथा ची शाळा हा आमच्या घरातला सध्या चर्चेचा विषय! आत्ता कुठे चार वर्षांची होत आहे ती! 

खरं तर एवढ्या लहान मुलांना शाळेत? ते ही पुस्तके, वह्या, शाळेचा घरचा अभ्यास, प्रसंगी बाहेरची शिकवणी? हा सगळा विचार केला कि डोकं जड होतं. सकाळी-सकाळी तीन-चार वर्षांची (आता तर अडीच वर्षांची देखील) मुले आपल्या आईवडिलां सोबत किंवा शाळेच्या बस/ व्हॅन ने शाळेला जाताना दिसली की वाटते - इतक्या लहान मुलांना कशाला हवी शाळा?
 
आधीच चौकटीतले जिवन जगणारे आपण! त्यातही आता स्पर्धेच्या युगात आहोत म्हणून मुलांचे बालपण खेळण्यासाठी असते हे त्यांना उमगण्याच्या आतच त्यांच्याकरीता देखील चौकटी आखून त्यांना वेळापत्रकात बसवून मोकळे होतो. मुलांची चौकट म्हणजे शाळा, शाळेतील अभ्यास, घरचा अभ्यास, बाहेरची शिकवणी हे ठरलेले आहे. आमच्या शेजारी ताई लहान मुलांची शिकवणी घ्यायच्या. त्यांच्या शिकवणीत सगळी मुले तीन ते सहा वर्ष गटातील. 

या शिकवणीत देखील आता वेगवेगळे प्रकार आहेत. आई वडिलांना आवडतं, त्यांची इच्छा आहे  म्हणून नाच गाणे किंवा इतर कोणतातरी क्लास (शिकवणी). अशा क्लासला जाणाऱ्या मुलांना विचारले तर सांगतील कि आई किंवा वडिलांनी या क्लासला टाकले. मुलांचे पालक म्हणतांना दिसतात कि "आम्ही नाही करु शकलो आवड असून देखील, म्हणून आमचे स्वप्न मुलं पूर्ण करतील." आपली स्वप्ने आपण लादतोय असे हे पालकांना लक्षातही येत नसेल काय?

शिकवणी च्या आधी विषय सुरु झाला होता शाळेचा. प्रश्न आहे की मुलांना कोणत्या वयात शाळेत पाठवायचे? कधी शिकवणी सुरु करायची? मी प्राथमिक धडे गावातल्या शाळेत घेतले. तिथे बालवाडी होती. केजीबीजी शहरात होती. त्यामुळे याच्याशी आमचा संबंधच नव्हता. बालवाडीत मस्त खेळ, गाणी, गमती-जमती आणि हसणे-खेळणे. अक्षर ओळख कशी झाली ते कळलंच नाही. सहा वर्षांचे असताना पहिली. स्पर्धा वैगेरे फारशी माहितीच नव्हती. थोडक्यात काय दडपण दबाव नव्हता.

आपण आजुबाजुला पाहिले तर अनेक अधिकारी पदावर वा विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्ती आवर्जून उल्लेख करतात कि, ते किती खडतर परिस्थितीतून पुढे आले. गावात, सरकारी शाळेतील वा छोट्या शाळेत शिकलोय. पण हेच जे स्वतः छोट्या शाळेत शिकले अन मोठ्या हुद्द्यावर पोहोचले, त्यांना आता वाटतेय की इंटरनॅशनल, मोठ्या स्कुल मधील शिक्षण चांगले! हा विरोधाभास का? 

लहान मुले काय केले तर जीवनात पुढे जाऊ शकतात यशस्वी होऊ शकतात यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन बालपणा पासून समजून घ्यावे लागेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या बालपणी फार खट्याळ होते, खूप खेळायचे, खोड्या करायचे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः सांगितले कि पदवीधर होईपर्यंत त्यांच्या हातून काही महत्त्वाचे काम होईल असे त्याना वाटत नव्हते. तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर आज जगातील काहीच परंतु अत्यंत विद्वान, नैतिक व क्रांतिकारी महान व्यक्तींपैकी एक म्हणून जगाच्या इतिहासात अजरामर, अनुसरणीय व अत्यंत सन्माननीय आहेत. 

असे कसे घडले? बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र वाचले तर पटते कि निश्चितच योग्य वयात योग्य माहिती व शिकवण मिळाली तर नक्कीच व्यक्तीचे आयुष्य महान बनू शकते.

शनिवार, १९ जून, २०२१

मोबाइल, कॉम्पुटर, टीव्ही, खेळ व शिक्षण


===

जवळपास 25-30 वर्षांपूर्वी मोबाइल नव्हते, कॉम्पुटर नव्हते. टीव्ही व टेलिफोन फारच कमी लोकांकडे होते. बऱ्यापैकी घरात रेडियो असायचे. तेव्हा आईवडील आपल्या मुलांसोबत असे वागत होते? मोबाइल, टीव्ही नसल्यामुळे लहान मुले मोठ्यांच्या आजूबाजूला, किंवा अंगणात मुलांच्या घोळक्यात खेळत. घरातील मंडळी कामात असली तरी मुले त्यांच्या आजुबाजुला खेळतांना, मोठी माणसे काय व कशी करतात? याकडे लक्ष ठेवून असत. (आजही तसेच करतात).

मला आठवतेय, तेव्हा मोठी माणसे पण मुलांसोबत गप्पागोष्टी करत, आपण काय करतोय याबद्दल माहिती देत. त्यामुळे नवे नवे शब्द माहित होत. ती माहिती त्यांनी सांगितलेल्या शब्दांत साठत राही. शाळेत खेळ, गाणी याच्या सोबत 'घरी माहिती झालेले शब्द' 'लिहिता येतात' याचा आनंद व्हायचा. शाळेतले खेळ, गाणी, अक्षर ओळख, शब्द ओळख सगळेच खूप आवडायचे! मग काय, शिक्षण आवडीचे.
 
पण आता सगळीकडे शिक्षणाचे नवनवीन प्रकार आलेत! स्पर्धेचे युग आहे म्हणतात! त्याकाळातही स्पर्धा होती पण आजची जरा वेगळीच! म्हणून आजचे पालक म्हणतात मुले म्हणजे जवाबदारी आणि आपण त्याअर्थाने जबाबदार पालक. माझ्या मुलांना जर काही आले नाही तर आम्ही जबाबदार पालक नाही हे सिद्ध होणार! ही भीती सतत असते. मुलांचे संगोपन, पालनपोषण म्हणजेच शाळा असे जाणून आता आपण सगळेच पैसे मोजून प्री-स्कूल, ट्यूशन लावून आपली जबाबदारी शिक्षकांवर टाकून मोकळे होतो. 

पण लहान वयातच एवढे क्लास? एवढ्या शिकवण्या? ज्यांना अनुभव आहे ते सांगतात कि मुले तीन-साडेतीन वर्षांची होतात तेव्हा ती खट्याळ-खोडकर असतात, त्यांना जे नको असतं त्याला नाही बोलतात. जे हवं त्यासाठी रडारड किंवा ओरडून जे हवय ते द्यायला (हट्ट पूर्ण करायला) लावतात. हाच खट्याळपणा हळू हळू घरच्यांना मुजोर वागणे वाटायला लागते. परिणामी मुलांच्या अशा वागण्याला निर्बंध लावण्यासाठी किंवा वळण लावायचा प्रयत्न म्हणून त्यांना 'कुठेतरी गुंतवून ठेवले पाहिजे' असे पालक ठरवितात.

हे वळण आपण लहानपणापासूनच लावत आलेलो असतो. अगदी तान्हा बाळाला देखील वळण लावावे लागते. जगण्याचे काही नियम माहित व्हावेत म्हणून आपण प्रयत्न करीत असतो. पण सहजपणे असा विचार काय प्रत्येकाच्या मनात येत असावा काय?

आपण बघतो कि जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा घरातली वडीलधारी मंडळी त्या बाळा साठी पूर्ण वेळ तयार असतात. त्याच्या सगळ्या गोष्टी बघतात. तहान भूक, अंघोळ-पांघोळ, हसणं-बघणं, ऐकणं-बोलणं, पकडणं-रांगणं-चालणं-धावणं-पडणं सगळ्याकडे लक्ष दिल जातं.  

 याचबरोबर घरात काही जण असेही असतात कि जे त्यांना वाटेल तेव्हा लहर म्हणून बाळाला झोपेतून उठवून त्याच्याशी गप्पा मारतात, म्हणजे आपल्याला हवे तेव्हा बाळाशी खेळतात. बाळही त्याला प्रतिसाद देते. कधी रडते तर कधी हसते. 

पण जस जसे बाळ मोठे होत जाते, चालायला लागते, एक-एक गोष्ट शिकायला लागत असते, तेव्हा त्याच्या विकासाच्या किती गोष्टींबद्दल आपल्याला माहिती असते? किती गोष्टींबद्दल आपण विचार करतो?

मुलांना त्यांच्या क्रियांना आपण कशा प्रतिक्रिया देतो? मुलं जेव्हा नवनवीन गोष्टी बघून त्याबद्दल विचारतात तेव्हा? किंवा स्वयंपाक घरातील भांडी दुसऱ्या खोलीत किंवा बाहेर घेऊन खेळ मांडतात तेव्हा? घराच्या भिंती किंवा जमिनीवर वस्तूने ओरखडे ओढतात तेव्हा? आपण करत असलेल्या गोष्टींचे अनुकरण करतात तेव्हा? आपण त्यांच्याशी कसे वागत असतो, याचा विचार आपण करतो का? 

आता सर्वच मुलांच्या हातात मोबाईल खेळणे म्हणून येत आहे. मुलांना एंगेज ठेवायचे म्हणून मोबाईल हाती देणे किंवा टीव्ही लावून देणे सोपे झाले आहे. पण यातून मुलांना काय मिळणार आहे? यामध्ये खेळ आहे कि शिक्षण आहे? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे का?

एवढा सगळं विचार केल्यावर शिक्षण व खेळ यात काय साम्य आहे? यावर विचार होणे आवश्यक आहे असे वाटते. शिक्षणावरून लक्षात येत आहे कि मुलांचे लालन-पालन, भरणं -पोषण, पालन-पोषण, संगोपन यावर खरेच पालकांसाठी देखील शिकवणी ची आवश्यकता आहे असे वाटत आहे.    

आपल्या मुलाना मोठे होताना पाहण्यासारखं सुख नाही. सहभागी करुन घेत ते अजुन सोपे आहे. यातुन मुले सहज शिकतात.