शनिवार, १९ जून, २०२१

मोबाइल, कॉम्पुटर, टीव्ही, खेळ व शिक्षण


===

जवळपास 25-30 वर्षांपूर्वी मोबाइल नव्हते, कॉम्पुटर नव्हते. टीव्ही व टेलिफोन फारच कमी लोकांकडे होते. बऱ्यापैकी घरात रेडियो असायचे. तेव्हा आईवडील आपल्या मुलांसोबत असे वागत होते? मोबाइल, टीव्ही नसल्यामुळे लहान मुले मोठ्यांच्या आजूबाजूला, किंवा अंगणात मुलांच्या घोळक्यात खेळत. घरातील मंडळी कामात असली तरी मुले त्यांच्या आजुबाजुला खेळतांना, मोठी माणसे काय व कशी करतात? याकडे लक्ष ठेवून असत. (आजही तसेच करतात).

मला आठवतेय, तेव्हा मोठी माणसे पण मुलांसोबत गप्पागोष्टी करत, आपण काय करतोय याबद्दल माहिती देत. त्यामुळे नवे नवे शब्द माहित होत. ती माहिती त्यांनी सांगितलेल्या शब्दांत साठत राही. शाळेत खेळ, गाणी याच्या सोबत 'घरी माहिती झालेले शब्द' 'लिहिता येतात' याचा आनंद व्हायचा. शाळेतले खेळ, गाणी, अक्षर ओळख, शब्द ओळख सगळेच खूप आवडायचे! मग काय, शिक्षण आवडीचे.
 
पण आता सगळीकडे शिक्षणाचे नवनवीन प्रकार आलेत! स्पर्धेचे युग आहे म्हणतात! त्याकाळातही स्पर्धा होती पण आजची जरा वेगळीच! म्हणून आजचे पालक म्हणतात मुले म्हणजे जवाबदारी आणि आपण त्याअर्थाने जबाबदार पालक. माझ्या मुलांना जर काही आले नाही तर आम्ही जबाबदार पालक नाही हे सिद्ध होणार! ही भीती सतत असते. मुलांचे संगोपन, पालनपोषण म्हणजेच शाळा असे जाणून आता आपण सगळेच पैसे मोजून प्री-स्कूल, ट्यूशन लावून आपली जबाबदारी शिक्षकांवर टाकून मोकळे होतो. 

पण लहान वयातच एवढे क्लास? एवढ्या शिकवण्या? ज्यांना अनुभव आहे ते सांगतात कि मुले तीन-साडेतीन वर्षांची होतात तेव्हा ती खट्याळ-खोडकर असतात, त्यांना जे नको असतं त्याला नाही बोलतात. जे हवं त्यासाठी रडारड किंवा ओरडून जे हवय ते द्यायला (हट्ट पूर्ण करायला) लावतात. हाच खट्याळपणा हळू हळू घरच्यांना मुजोर वागणे वाटायला लागते. परिणामी मुलांच्या अशा वागण्याला निर्बंध लावण्यासाठी किंवा वळण लावायचा प्रयत्न म्हणून त्यांना 'कुठेतरी गुंतवून ठेवले पाहिजे' असे पालक ठरवितात.

हे वळण आपण लहानपणापासूनच लावत आलेलो असतो. अगदी तान्हा बाळाला देखील वळण लावावे लागते. जगण्याचे काही नियम माहित व्हावेत म्हणून आपण प्रयत्न करीत असतो. पण सहजपणे असा विचार काय प्रत्येकाच्या मनात येत असावा काय?

आपण बघतो कि जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा घरातली वडीलधारी मंडळी त्या बाळा साठी पूर्ण वेळ तयार असतात. त्याच्या सगळ्या गोष्टी बघतात. तहान भूक, अंघोळ-पांघोळ, हसणं-बघणं, ऐकणं-बोलणं, पकडणं-रांगणं-चालणं-धावणं-पडणं सगळ्याकडे लक्ष दिल जातं.  

 याचबरोबर घरात काही जण असेही असतात कि जे त्यांना वाटेल तेव्हा लहर म्हणून बाळाला झोपेतून उठवून त्याच्याशी गप्पा मारतात, म्हणजे आपल्याला हवे तेव्हा बाळाशी खेळतात. बाळही त्याला प्रतिसाद देते. कधी रडते तर कधी हसते. 

पण जस जसे बाळ मोठे होत जाते, चालायला लागते, एक-एक गोष्ट शिकायला लागत असते, तेव्हा त्याच्या विकासाच्या किती गोष्टींबद्दल आपल्याला माहिती असते? किती गोष्टींबद्दल आपण विचार करतो?

मुलांना त्यांच्या क्रियांना आपण कशा प्रतिक्रिया देतो? मुलं जेव्हा नवनवीन गोष्टी बघून त्याबद्दल विचारतात तेव्हा? किंवा स्वयंपाक घरातील भांडी दुसऱ्या खोलीत किंवा बाहेर घेऊन खेळ मांडतात तेव्हा? घराच्या भिंती किंवा जमिनीवर वस्तूने ओरखडे ओढतात तेव्हा? आपण करत असलेल्या गोष्टींचे अनुकरण करतात तेव्हा? आपण त्यांच्याशी कसे वागत असतो, याचा विचार आपण करतो का? 

आता सर्वच मुलांच्या हातात मोबाईल खेळणे म्हणून येत आहे. मुलांना एंगेज ठेवायचे म्हणून मोबाईल हाती देणे किंवा टीव्ही लावून देणे सोपे झाले आहे. पण यातून मुलांना काय मिळणार आहे? यामध्ये खेळ आहे कि शिक्षण आहे? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे का?

एवढा सगळं विचार केल्यावर शिक्षण व खेळ यात काय साम्य आहे? यावर विचार होणे आवश्यक आहे असे वाटते. शिक्षणावरून लक्षात येत आहे कि मुलांचे लालन-पालन, भरणं -पोषण, पालन-पोषण, संगोपन यावर खरेच पालकांसाठी देखील शिकवणी ची आवश्यकता आहे असे वाटत आहे.    

आपल्या मुलाना मोठे होताना पाहण्यासारखं सुख नाही. सहभागी करुन घेत ते अजुन सोपे आहे. यातुन मुले सहज शिकतात.

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

चहासोबत लेक्चर

"एक विचारू काय बाई, तुम्हाला राग तर नाही येन न" तिने संकोचल्यासारखे आईला विचारले.
"विचारा, राग कश्याला येणार" आई म्हणाली.
मग तिला थोडा धीर मिळाला आणि ती बोलली "तुम्ही आधी खूप गरीब होत्या म्हणे? खंर आहे ना"?
"हो"
"…… तो सांगत होता आम्हाले, तुम्ही आता श्रीमंत कसे झाले म्हणून" ती मोठ्या उत्सुकतेने म्हणाली.
"कसे ?" आईने विचारले
"तुम्ही म्हणे …… या बुवाचा नवस केला अन तो पावला तुम्हाले, म्हणून त तुम्ही झोपडीतून या बंगल्यात रहायाले आले. लय पैसे भेटले म्हणे " आपल्याला काहीतरी मंत्र मिळेल या हेतूने ती अधिकच स्पष्ट बोलू लागली होती.
"काय ?"
"आमच्या तिकडे सगळे जन तेच म्हणतात" ती म्हणाली
"ये घरात " भिंतीवरचे फोटो दाखवत आई म्हणाली "हे कोणाचे फोटो आहे?"
बाबासाहेब, जोतीराव फुले, सावित्रीबाई, रमाई, बुद्ध ….
"सगळ घर फिरली तरी हेच अन पुस्तक, कोणताच बुवाचा फोटो नाही आमच्या घरात, बुवावर विश्वास ठेवला असता तर,माझी पोर बुवा झाली असती ऑफिसर नाही, मुलं शिकली नसती अन परिस्थिती पण बदलली नसती."
"मग तो कावून असा म्हणते? अन लय लोक म्हनतात" तिची शंका तिने विचारलीच
"आम्ही गरीब होतो, पण पोरांना शिकवले तर ते चांगले जीवन जगतील, म्हणून आम्ही सगळ्या पोरांना शिकविले. माझ्या पोरांना पायात चप्पल पण भेटत नव्हती पण आता माझा नातू आमच्या कार मध्ये शाळेत जातो, दिसते ना, कोणाचं एकू नको, कोणी पावत नाही, लेकराले शिकव मंग तू पण श्रीमंत होशील. फक्त बाबासाहेबाचे ऐक कल्याण होईल.........." चहासोबत मोठे लेक्चर पण ऐकावे लागले त्या बाईला.....
(घरी गेल्यावर ऐकलेला एक मजेदार किस्सा)

विकृत संस्कृती

किती कमजोर आहे हा पुरुष
एखाद्या महिलेचा (ती कोणत्याही वयाची असो) पती निधन पावल्यानंतर तिचे आप्त स्वकीय तिचे सांत्वन करीत असताना एक गोष्ट आवर्जून सांगतात "सांभाळून घे ग बाई, मुलांना तुझ्याशिवाय कोण आहे आता. तूच आता आई अन बाप सुद्धा हो." आणि मग ती सगळ्या दुखावर मात करीत आई आणि बाप या दोन्हीही भूमिका खंभीरपणे पार पाडते. (याला बोटावर मोजण्यासारखे अपवाद असू शकतात)
मात्र हेच चित्र उलट झाले तर ….
तिचे निधन झाल्यास सगळे त्या पुरुषाबद्दल चर्चा करतांना "बिचारा पुरुष एकटा कसा राहील? घरात बाई तर पाहिजेच, मुलांना आई पाहिजेच, तो काय काय करेल? ......." या अश्या अनेक गोष्टी सुरु होतात आणि मग अमक्याची मुलगी आहे, तमक्याची बहिण आहे अशी चर्चा सुद्धा लगेच सुरु होते……
असे पहिले कि वाटते किती कमजोर, दुबळा आहे हा पुरुष …….
आज आपल्या देशात ६ करोडपेक्षा जास्त विधवेच आयुष्य जगणाऱ्या महिला भारतीय समाजाच्या विकृत मानसिकतेच दर्शन घडविते. स्त्रीला सतत दुर्बल बनवणाऱ्या या परंपरा जिवंत असतांना काय "ती" सक्षम होईल ?

असे का ?

सामाजिक परिवर्तन होत असलेल्या भारतीय समाजात दोन वर्ग दिसून येतात. एक परंपरेच्या नावाखाली चाललेल्या शोषणाला संस्कृती आहे, जतन केले पाहिजे म्हणून धडपडतो तर दुसरा वर्ग जो या शोषणाला कायम बळी पडत आला असून आता जागृत होऊन या बाबीला विरोध करतो .
आजकाल शिकलेले विशेषता लोककलेमध्ये उच्च शिक्षण घेतलेले हि कला नष्ट होत आहे म्हणून फार चिंतीत दिसतात. लोककला म्हणजे काय तर जागरण, गोंधळ, जोगवा मागणे इत्यादी. हे असे असेल तर वाघ्या- मुरली, जोगतिनी, देवदासी पण जिवंत ठेवाव्या लागतील.
ज्यांना वाटते संस्कृती टिकून राहावी त्यांनी ती टिकावी म्हणून आपला बळी द्यावा, इतरांना त्यांचे कर्तव्य शिकवू नये.
काय सामाजिक परिवर्तन झालेल्या घरातील आई- वडील आपल्या पाल्याला या लोककलेचा भाग होऊ देतील?

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

आणि म्हणे स्त्रिया सक्षम झाल्या...

एक मैत्रीण दवाखान्यात आयाचे काम करणारी… (… मावशी), वय 30 वर्षे. शाळेत आठवीमध्ये शिकत असतांना तिच्यापेक्षा तेरा वर्षे मोठ्या पंधरावी शिकलेल्या मुलाशी लग्न झाले. आज ती दोन मुलींची आई, मोठी मुलगी दहावित शिकते. गेली पाच – सहा वर्षे नवरा काहीच काम करत नाही, त्याला वेड लागले म्हणतात. वेडा असला तरि ती उशिरा आलेली चालत नाही, रोज दारू पाहिजेच. तिच्याच आईच्या घरी एका खोलीत संसार करते, मूलींना शिकून मोठे करायचे स्वप्न पाहते. सर्वांचा खर्च कसाबसा तीच करते. तरिपण त्याचे सर्व.... सहन करते. त्याला सोडावे असे तिला वाटत असले तरि तिची आई तिला विरोध करते. कारण काय तर म्हणे शेवटी नवरा आहे, तोच तुला म्हातारपणीचा आधार.... स्वत: मेहनत करून, कष्टाची कमाई खात असली तरि तिच्या जिवनाचा निर्णय ती घेवू शकत नाही.
दुसरी सुशिक्षित व्यवसायाने डॉक्टर. नवरा सुद्धा अभियंता भरपूर कमावतो. दोन मुले, घरी सर्वच सुविधा उपलब्ध म्हणजेच सुखी कुटुंब. दर दोन - तीन दिवसानी मोठ्याने भांडणाचा आवाज, तिच्या आई - बहिनीवरून तिला शिव्या. जीव वाचविण्यासाठी त्या रात्री शेजारी मैत्रिणीकडे ती आधार घेणार, सगळे शांत होण्याची वाट पाहणार. सामाजिक प्रतिष्ठा म्हणून त्याला सोडू शकत नाही. . . या अश्या कितीतरी मैत्रिणी कोणत्या न कोणत्या कारणाने अपमानाचे जिणे जगत आहेत. काय हि समस्या नाही ? काय या व्ययक्तिक समस्या आहेत ? कोण अश्या विकृत पुरुषी मानसिकतेला दंड देणार आणि कोण तिला मानसिक / भावनिक आधार देणार ? काय हे समाजाचे काम नाही.?  
एकीकडे एकुलती एक मुलगी म्हणून तिला हवे ते द्यायचे. समाजात प्रतिष्ठा, आदर्श निर्माण करायचा आणि अपेक्षा करायची कि तिला तिचे निर्णय स्वत: घेवू देणारा जीवनासाथी मिळावा. त्याचवेळी आपल्या पत्नीला काही येत नाही असे गृहित धरून तिला निर्णय घेण्यापासून परावृत्त करायचे. . काय एक मानव म्हणून आपण एकमेकांचा आदर करणार आहोत ? 
 म्हणे स्त्रिया सक्षम  झाल्या.      

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

किंमत मोजल्याशिवाय परिवर्तन संभव नाही

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या संदेशास स्त्रियांच्‍या उत्‍थानासंदर्भात समजून घेतांना... 

भारतीय समाजातील स्त्रियांच्या परिस्थितीवर नेहमीच लिहिले जाते, चर्चा केल्या जातात. याबाबत अग्रेसर असणारी प्रसारमाध्यमे नेहमी प्रचार करतात की आज भारतातील स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत. सततच्या अशा प्रकारच्या प्रचारामूळे सगळया स्त्रियांचा विकास झाला आहे असे वाटू लागते अर्थात तसा भ्रम निर्माण होतो आणि हजारो वर्षे विकासापासून वंचित असलेल्या बहुजन समाजातील स्त्रियांची परिस्थिती आजही बदललेली नाही, यावर सोयीस्‍करपणे पडदा पाडला जातो. जातीव्यवस्थेमुळे स्त्री त्यातही बहुजन समाजातील स्त्री ही कायम मागासलेली आहे या बाबीवर चर्चा होत तर नाहीच त्‍याचबरोबर त्या आजही शिक्षण, रोजगार, आरोग्याच्या सुविधा अशा अनेक मुलभूत अधिकारांपासून वंचित आहेत इकडेही लक्ष जात नाही. अशा स्थितीत आपल्‍यावर येणाऱ्या असंख्‍य अडचणींवर मात करीत, परिस्थितीला सामोरे जात काहीजणी आपले कुटुंब सांभाळून समाजाचे प्रतिनिधित्व करतांना दिसून येतात. ही जरी जमेची बाजू असली तरी हे प्रतिनिधित्‍व वाढवत नेऊन शोषित वर्गातील समस्‍त स्त्रियांचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी काम करावे लागेल हे सत्‍य स्‍वीकारावे लागेल.
स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाच्‍या दृष्‍टीने विचार केल्‍यास सर्वप्रथम लक्ष जाते ते त्‍यांना भेडसावणाऱ्या असंख्‍य समस्‍यांकडे. मग त्‍या समस्‍या घरातील असोत, वस्‍तीतील असोत अथवा समाजातील, स्त्रीच्‍या समस्‍या अपार आहेत. कुटुंबाचे, जातीचे, धर्माचे व परिस्थितीचे बंधन म्हणून जे काही शालेय शिक्षण तिला मिळते ते एक तर विकासाच्‍या दृष्टिकोणातून अपूरे असते आणि त्‍यात भर म्‍हणून की काय परंपरेतून तिची जी जडणघडण होते ती तिच्‍यासाठी संकटे निर्माण करणारी ठरतात व ती अनेक अत्‍याचारांना बळी पडते. अशी कोणती यंत्रणा आढळून येत नाही की जी स्‍त्रीला स्‍वतंत्र करेल, नव्‍या जगाच्‍या निर्मितीची तीची जी जबाबदारी आहे ती पेलण्‍यासाठी तिला सक्षम करेल. फुले-आंबेडकरी विचारधारेमध्‍ये स्‍त्रीला स्‍वतंत्र करणारे संपूर्ण मार्गदर्शन आहे. परंतु ते अंमलात आणण्‍याची म्‍हणजेच प्रत्‍यक्ष कृतीत उतरविण्‍याची जबाबदारी कोण घेणार? हा खरा प्रश्‍न आहे.
परंतु आज स्‍त्रीच्‍या पोटी सुदृढ बाळ जन्‍माला यावे किंवा स्‍त्री-पुरुष असमतोल होवू नये म्‍हणून यंत्रणा झटतांना दिसतात. सरकारी किंवा एनजीओंच्‍या आरोग्‍य विषयक यंत्रणा याकरीता मोठा खर्च करतांना दिसतात, मोठया-मोठया पंचतारांकीत चर्चासत्रांचे आयोजन करतात. परंतु तिच्‍या मानसिक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक, कलाकौशल्‍यगुण अशा सर्वांगिण विकासासाठी काम करण्‍यासाठी यंत्रणांचे हात अखडतात, थरथरतात. स्‍त्रीवर कुटुंब व समाज घडविण्‍याची जबाबदारी आहे असे म्‍हंटले जाते परंतु ती तीची ही जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम व्हावी यासाठी यंत्रणांची शोधाशोधच करावी लागते.
अशा स्थितीत, जीवन जगतांना स्‍त्रीवर टाकण्‍यात आलेल्‍या जबाबदाऱ्या, तिला अस्तित्‍वासाठी करावा लागणारा संघर्ष, तिच्‍या वाटयास येणारी मानहानी या सर्वांना तोंड देत-देत ती फक्‍त जीवन जगत असते. आणि मग नशीब, दैव, कर्मकांड याच्‍या आहारी जाते. साहजिकच अशा प्रकारे जीवन जगणाऱ्या स्‍त्रीची येणारी प्रत्‍येक पिढी सुद्धा तिच्यासारखीच आपले नशीब वाईट मानून वाट्याला आलेले अपमानाचे जिवन जगते. या संदर्भात फुले-आंबेडकरांनी जे मार्गदर्शन केले आहे ते समजून घेतले तर आपल्‍याला सन्मानाचे मानवी जीवन आणि प्रत्‍यक्षातील अमानवीय जीवन याची तूलनात्‍मक प्रचिती येते. परंतु हे केवळ वैचरीक न राहता फुले-आंबेडकरांनी केलेले मार्गदर्शन प्रत्‍यक्षात कृतीत आणण्‍यासाठी कार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे.
ही बाब लक्षात घेऊन आपल्‍या मार्गदात्‍यांनी केलेल्‍या मार्गदर्शनाला समजून घेत-घेत आम्‍ही काही महिलांनी “क्रांतिज्योती” या नावाने पुण्‍यात एक ट्रस्‍ट स्‍थापन केला. आम्‍ही आमच्‍या कामाचे क्षेत्र ठरविले. त्‍यासाठी आम्‍ही सहा महिने, वर्षभराची योजना बनवून कार्यक्रम आखणी करुन त्‍यावर रोज अंमल करतो. म्‍हणजेच आम्‍ही केवळ विशिष्‍ठ दिवशी किंवा वेळी आयोजित कार्यक्रमापुरते मर्यादीत नसतो तर सततच्‍या प्रक्रियेत आम्‍ही स्‍वतःला गुंतवून घेतले आहे. या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळ्याजणी रोज आमच्‍या कार्यालयात एकत्र येवून कार्यालयीन वेळेत कामे करतो. “क्रांतिज्योती” या नावाने आम्‍ही करीत असलेले कार्य हे एक “मॉडेल” म्‍हणून आम्‍ही विकसीत करीत आहोत.
या अंतर्गत आम्‍ही आमचे कार्य मुख्‍यत्‍वे दोन भागात विभागलेले आहे. महिलांना त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या, कुटुंबाच्‍या व समाजाच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी नेतृत्‍वविकासाचे प्रशिक्षण. तसेच आर्थिक समस्‍यांतून बाहेर निघण्‍यासाठी कौशल्‍याधारीत व्‍यवसायिक प्रशिक्षण आणि व्यवसाय उभे करण्‍यासाठी सहकार्य. नेतृत्‍व विकास प्रशिक्षण हा जरी सतत चर्चेत येणारा शब्‍द प्रयोग असला तरी आम्‍ही देत असलेले प्रशिक्षण हे फुले-आंबेडकरांच्‍या विचारधारेवर आधारीत आहे. याचा एक अभ्‍यासक्रम आम्‍ही बनविला आहे. आम्‍ही ‘‘क्रांतिज्‍योती स्‍टडी अॅंड ट्रेनिंग सेंटर’’‘‘रमाई व्‍होकेशनल ट्रेनिंग अॅंड बिजनेस सेंटर’’ असे दोन प्रकल्‍प सुरु केले आहेत. अर्थार्जनसाठी व्‍यवसाय करणाऱ्या महिलांच्‍या उत्‍पादनांना बाजारपेठ मिळवून देण्‍यासाठी आम्‍ही “ब्‍लू बर्ड्स” या नावाने वस्‍तूविक्रिकेंद्र (शॉप) सुरु केले आहे. आमच्‍या प्रत्‍येक कामाचे आम्‍ही आमच्‍यापरीने डॉक्‍यूमेंटेशन म्‍हणजेच दस्‍तावेजीकरण करीत असतो.
आमचे हे कार्य अनेक परिस्थितींना सामोरे जात, समस्‍यांवर मात करीत आम्ही सुरु केले आणि पुढे नेत आहोत. आज पुण्‍यातील येरवडा, विश्रांतवाडी परिसरातील ५०० पेक्षा जास्त कुटुंबांशी आम्‍ही संवाद साधला. ६०० पेक्षा जास्‍त महिलांचे संघटन करीत आहोत. ४० पेक्षा जास्त महिला स्‍वंयस्‍फुर्तीने स्‍वयंसेवक म्हणून काम करतात. यातील बऱ्याच महिला २७ स्वयंसहाय्यता गट, २ व्यवसाय गटांत कार्यरत आहेत. व्यवसाय प्रशिक्षणातून तयार झालेल्या महिला रोजगार मिळवित आहेत. ज्या महिलाना स्वत:चे नाव सांगायला सुद्धा भीती वाटत असे त्या आज ७०-८० लोकांसमोर उभे राहून मनोगत व्यक्त करतात, बहुजन समाजाच्या, स्त्रियांच्या समस्यावर बोलतात, महापुरुषांचे विचार कृतीत उतरवित आहेत. एवढेच नाही तर आपल्‍या समस्‍या जर सरकारी कामाशी संबंधीत असतील तर त्‍यासंदर्भात अर्ज लिहितात, आपल्या वस्तीतील समस्या सोडविण्‍याचा प्रयत्‍न करतात, मुलींचे व मुलांचे अभ्यासवर्ग घेवून त्यांचे भवितव्य उज्ज्वल बनविण्यासाठी झटतांना दिसतात. या सर्वांमागे बहुजन समाजाच्‍या महानायिका व महानायकांची प्रेरणा आहे. बहुजन समाजातील महानायक महानायिकांनी सतत महिलांच्या प्रगतीवर भर दिला आहे. या कार्याप्रती आम्‍ही समर्पित आहोत.
हे सर्व कार्य संघटीत व सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नांची मागणी करते. हे संघटीत व सातत्‍यपूर्ण कार्य करीत असतांना अनेक साधन-संसाधनांची नेहमी जमवाजमव करावी लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे कि किंमत मोजल्‍याशिवाय परिवर्तन संभव नाही. येथे किंमतीचा अर्थ हा वेळ, बुद्ध‍ि, कौशल्‍य, संसाधने व रुपये यांच्‍याशी संबंधीत आहे. एखाद्या मंडळाच्या माध्यमातून जेव्हा जयंती किंवा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो तेव्हा त्यासाठी त्या मंडळाची वर्गणी गोळा करतांना किती दमछाक होते, यावरुनच आम्ही महिला हे सगळे कसे सांभाळतो याचा आपण अंदाज करू शकता.
वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे आम्‍ही “क्रांतिज्योती” हे एक मॉडेल म्‍हणून विकसित करीत आहोत. जेथे अनेक महिला कार्य करतील. केवळ शहरी भागातच नव्‍हे तर ग्रामिण भागातही हे मॉडेल कशाप्रकारे अमलात आणता येईल याचा प्रयत्‍न आम्‍ही करीत आहोत. महिलांचे जे संघटन (संघटना नव्‍हे) आम्‍ही घडवित आहोत व जे काही प्रयत्‍न आम्‍ही करीत आहोत त्या प्रयत्नांना आलेले यश हे जे-जे लोक क्रांतिज्‍योतीच्‍या कार्यालयाला भेट देतात त्‍यांना अनुभवास येते. गेली दोन वर्षे सतत आम्ही सगळ्याजणी काम करीत आहोत. क्रांतिज्‍योतीच्‍या कार्यालयात सात जणी वेगवेगळया जबाबदाऱ्या सांभाळतात. कार्यालय म्‍हंटले की अनेक बाबींचा खर्च हा होतोच. मग ते कार्यालयाचे भाडे असो, लाईटबील असो, टेलिफोनचा खर्च असो, स्‍थानिक प्रवास खर्च, स्‍टेशनरी, आकस्किम खर्च असो, कार्यालयात काम करणाऱ्या मैत्रिणींचे मानधन असे अनेक खर्च आहेत ज्‍याकरीता आम्‍हाला नेहमी आर्थिक जमवाजमव करावी लागते. प्रत्‍येक महिन्‍याच्‍या पहिल्‍या व शेवटच्‍या आठवडयात आम्‍हाला याकरीता प्रचंड मेहनत करावी लागते. अनेक लोकांना भेटावे लागते. महिन्‍यातील कामाच्‍या चार आठवडयांपैकी जर दोन आठवडे या मध्‍येच जायला लागले तर अपेक्षित रिझल्‍ट अपेक्षित वेळेत यायला अनेक अडचणी येतात.
हे सर्व करीत असतांना जेव्‍हा आम्‍ही समाजाकडे बघतो तेव्‍हा हे जाणवतेच की आपले महानायक फुले-आंबेडकरांच्‍या महान कार्यामुळे, चळवळीमुळे समाजात एक असा वर्ग निर्माण झाला आहे की ज्‍याच्‍या भौतिक गरजांची पूर्तता झाली आहे. केवळ एवढेच नाही तर त्‍याहीपेक्षा आता त्‍यांची खरोखरीच चंगळ झाली आहे असे म्‍हंटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्‍येक शहरात कमीत कमी हजार-पाचशे जण असे असतात की ज्‍यांनी वर्षाकाठी दहा हजार रुपये जरी आपल्‍या चंगळवादातून बाजूला काढले तरी वर्षाकाठी ५० लाख ते १ कोटी रुपये सहज निर्माण होवू शकतात. महानगरांमध्‍ये तर हा आकडा प्रचंड मोठा होवू शकतो. आज जे काही चळवळीचे कार्य सुरु आहे ते खऱ्या अर्थाने ज्‍यांना समस्‍येची जाणीव आहे त्‍यांच्‍या आर्थिक योगदानाच्‍या जोरावर सुरु आहे. नमूद करण्‍यासारखी बाब ही आहे की समस्‍येची जाणीव असणारा जो वर्ग आहे तो स्‍वतःच इतका समस्‍यांनी ग्रस्‍त आहे तरीही तो त्‍याच्‍या परीने कोणताही कार्यक्रम असो मग तो जयंतीचा कार्यक्रम असो, सामाजिक असो, धार्मिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, प्रबोधन असो, साहित्‍य असो किंवा संघर्ष असो मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतो. कारण या कार्याचे महत्व त्यांना पटलेले असते. समाजात यावर्गाव्यतिरिक्त दुसरा वर्ग असा देखील असतो की त्याला वाटत असते की सचोटीने व इमानदारीने कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्‍हावेत. परंतु या करीता साधनसंसाधनांची आवश्‍यकता असते ही बाबदेखील आपण समजून घेतली पाहिजे.
 आम्‍ही महिलांनी जे कार्य हाती घेतले आहे, जे मॉडेल निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही करीत आहोत त्‍याला आपल्‍या सर्वांच्‍या मदतीची विशेष म्‍हणजे आर्थिक मदतीची अत्‍यंत आवश्‍यकता आहे. प्रत्‍येक तालुक्‍यात महिलांचे पाच हजार लोकसंख्‍येनुसार सात-आठ जणींचे दोन-तीन समूह जरी रोज योजनाबद्ध पद्धतीने कार्य करु लागले तर मोठे परिवर्तन येणाऱ्या काळात घडू शकेल यावर आमचा विश्‍वास आहे. परंतु याकरीता केवळ शाब्दिक मार्गदर्शन नव्‍हे तर प्रत्‍यक्ष सहकार्याची आवश्‍यकता आहे. जर आपल्यात खरोखरच सहकार्याची भावना निर्माण झाली तर कृपया अधिक माहितीसाठी www.krantijyoti.org ला भेट द्या.  

शनिवार, ७ जानेवारी, २०१२

ओवी सावित्रीची

पहिली माझी ओवी ग ! सावित्रीच्या बुद्धीला !
स्त्रियांच्या शिक्षणाचा ! पाया तू घातला !
अशिक्षित अडाणी तू ! पतीपाशी शिकली !
मुलींसाठी पहिली ! शाळा तुम्ही काढली !!

दुसरी ओवी गायिली ! तुझ्या ग धैर्याला !
दगडगोटे खाऊनी ! चालवली तू शाळा!
घराबाहेर काढले ! गुंडानी अडविले !
धीराने तोंड दिले ! सगळ्या ग त्रासाला !!

तिसरी माझी ओवी ग ! तुझ्या मोठ्या मनाला !
फसलेल्या विधवेचा ! सांभाळ तू केला !
अबला नि अनाथांचे ! मायबाप होऊन !
यशवंत बाळाला ! दत्तक घेतला !!

चौथी ओवी गायिली ! तुझ्या थोर हृदयाला !
माणुसकीचा झरा ज्यात ! नित्य ग वाहिला !
जोतबांची सावली ! नाही तू राहिली !
सत्यधर्मप्रकाशात ! तेजानं तळपली !!

दुःखितांच्या सेवेत ! देह तू ठेविला !
स्मरण तुझे करूनी ! वसा मी घेतला !
भगिनींना जागवीन ! संघटित करीन !
ज्ञानज्योत लावीन ! हेच तुला नमन !!