बुधवार, ६ एप्रिल, २०२२

मानसिकता जवळपास सारखीच...

काही दिवसांपूर्वी आमच्या बिल्डिंगच्या गेटजवळ एक चारचाकी थांबली. 7/8 वर्षांच्या मुलासोबत त्याचे आईवडील आणि आजी गाडीतून उतरले. गेटमधून आत आले आणि तो छोटा मुलगा परत मागे वळला. गेटच्या बाहेर जाऊन आवाराच्या भिंतीकडे तोंड करून त्याने लघवी केली. तोपर्यंत त्याचे आईवडील घरात पोहचले होते. पहिल्या मजल्यावर असलेल्या कुटुंबाकडे ते पाहुणे म्हणून आले होते. खर तर, पहिल्याच मजल्यावर जायचं होतं, गेटबाहेर करण्यापेक्षा तो मुलगा धावत पळत वर जाऊन बाथरूममध्ये पण जाऊ शकत होता. त्याच्या मामाचं घर आहे, नेहमी येत असतो तो इकडे पण... सामाजीकरण / Socialisation सुरवातीला घरातून होते, असे म्हणतात मग या गोष्टींचा समावेश बहुतेक घरात होत नसावा. बागेत सुद्धा आया आपल्या मुलांना सहज बोलतात जा तिकडे कर, जेव्हा की व्यवस्थित सोय केलेली असते. आणि मग पुरुष जेव्हा असे कुठेही भिंतीकडे तोंड करून उभे दिसले की म्हणायचं की पुरुषांना लाज वाटत नाही... असल्या कृतीचं समर्थन मुळीच नाही पण ज्या समाजीकरणाच्या प्रक्रियेत मुली/ महिला घडविल्या जातात, अगदी तसेच मुलं/ पुरुष पण घडविले जातात. फक्त मुलींना बंधन शिकविली जातात तर मुलांना निर्लज्ज वागणं? 

घटना एक

काल परवाचीच घटना, आम्ही दोघी मायलेकी आमच्या ओळखीच्या घरी गेलो होतो. माझ्या लेकीपेक्षा एक वर्षे मोठा असलेला मुलगा, आई गृहिणी पण इंजिनिअरची डिग्री असलेली तर वडील कॉलेजमध्ये शिकवणारे. आमच्या गप्पा सुरु असतांना ही दोन्ही मुले आम्ही बसलो त्याच हॉलमध्ये आमच्या समोर खेळत होती. पाच वाजत आले आणि ऊन जरा कमी झाले म्हणून समोरचे दार उघडलं आणि ही दोन्ही पोरं अंगणात खेळू लागली. फक्त गेटच्या आत खेळा असे सांगून आम्ही हॉलमध्येच बसलो होतो. काही वेळाने माझी लेक आत येऊन मला म्हणाली, त्याला असं काय आहे? त्याने पकडून कुंडीतील झाडावर सु सु केली.. पहिल्यांदाच पाहिलं म्हणून तिला प्रश्न पडणे साहजिकच होतं. तिला तर सांगितले पण त्या मुलाच्या आईला सांगितलं की मुलांना याच वयात अश्या गोष्टींचं योग्य वळण लावलं पाहिजे. तर लगेच त्या मुलाची आजी ( तिची आई )भडकली, आम्ही काय त्याला बाहेर मुतायला शिकवतो काय? आता बाहेर एवढे लोकं करतात तर आम्ही घरात येतो. मोठा झाला की कळेल त्याला... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती म्हणाली की आमच्या पोराला सांगण्यापेक्षा तुझ्या पोरीला सांग ना की कोणी अस मुतत असेल तर तिकडे पाहू नको... अर्धी दुनिया असे करते, कोणाकोणाला सांगशील... खरं तर मी त्यांच्या घरी पाहुणी तरी ती बाई येवढं बोलली, समजा दुसरं कोणी असते तर? यात एक गोष्ट म्हणजे हे सर्व बोलणं होत असताना त्या मुलाची आई मात्र शांत होती.

घटना दोन

एका एनजीओमध्ये बेघर मुलांसोबत काम करणारी बारावीपर्यंत शिकलेली धार्मिक घरातील मैत्रीण. अश्या धार्मिक लोकांकडे असते तसे तिच्या घरी सुद्धा एका बापूचे पूजन व्हायचं. त्याच्या सत्संगाला जाणारी ही मंडळी. त्यांच्या घरी त्याच्या फोटोचं रोज पूजन व्हायचं, आणि त्या स्वयंघोषित संतावर स्त्रियांच्या शोषणाचे आरोप झाले. त्याला पोलीस कस्टडी आणि नंतर कारागृहात रवानगी झाली. त्यानंतर तिच्या घरी तो फोटो अन पूजन दिसलं, तिला विचारले असता ती म्हणाली, तो पुरुष आहे, तो नालायक आहे पण या स्त्रिया का जवळ जातात? कुणी स्वताहून तर असं काही करणार नाही, बायांना समजत नाही का या माणसाची नियत खराब आहे? सस्तंग ऐकावं, प्रसाद घ्यावा, गर्दी असेल तेव्हाच रहावं तिथे मग कुणाची हिम्मत होईल. बाया लगट करतात मग त्याला संधी भेटल्यावर तो कश्याला सोडेल? बापू, संत महात्मा असला तरी, आहे तर पुरूष....

घटना तीन

पदव्युत्तर शिक्षण घेतलेली. चार पुस्तके वाचलेली आणि चार पुस्तके लिहिलेली लेखिका. समाजमाध्यमातून संपर्कात आलेली. खूप हुशार, समजदार, अनेक कलागुणांना अंगी बाळगून असलेली मैत्रीण. मताधिकार वापरू शकतो म्हणजे तरुण असलेल्या एका मुलाची आई. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून पाच सहा वर्षांपासून कायदेशीर वेगळी झालेली. चारेक वर्षांपूर्वी शांत जीवनाच्या शोधात एका महिन्यासाठी तीने (भिक्खू) श्रामणेरी दीक्षा घेतली होती. त्याच दरम्यान तिच्यापेक्षा 6/7 वर्षे वयाने लहान, अविवाहित उच्च शिक्षित तरुण श्रामणेर तिच्या संपर्कात आला. विश्वास, प्रेम आणि नंतरच्या काळात त्यांनी लग्न केले. ती सर्वसामान्य जीवन जगत आहे तर तो अजूनही चिवर धारण करून आहे. जेव्हा त्याला तिला भेटायला यायचं असते तेव्हा तो सर्वसामान्य कपडे घालून येतो. मला कायम वाटतं की तो ज्या बुद्ध धम्म परंपरेला मानतो म्हणजे चिवर धारण केले आहे आणि त्या पवित्र वस्त्राचा अपमान करतो याचा अर्थ तो तिलाही धोका देत असावा. पण एक दिवस चर्चा सुरू असताना ती म्हणाली की, बाया काही कमी नसतात, त्यांनी चिवर घातले पण देखणे तरुण आहेत म्हणून काही बाया स्वताहून त्यांना व्हिडिओवर आपले शरीर उघडे करून दाखवतात. मला वाटलं त्याने असेच सांगितले असेल तर ती म्हणाली की तिने स्वता त्याच्या मोबाईल मध्ये त्या बायांचे स्क्रीनशॉट बघितले. त्याने तिला दाखवण्यासाठी ठेवले होते म्हणे. तिच्या बोलण्याने मला वाईट नाही तर तिच्या विचाराची कीव आली. एवढी शिकलेली, लेखिका कवयित्री आणि ती म्हणते, ' चिवर जरी अंगावर असलं तरी आहे तर तो पुरुष, शारीरिक गरज,  लैंगिक भावना आहेत त्याला...
-------
तुम्हालाही असे अनुभव आणि त्यामुळे मनात निर्माण आहेतच..

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

कोरोना महामारी, लॉक डाऊन, शाळाबाह्य मुलांचा प्रश्न

 कोरोना महामारी, लॉक डाऊन, शाळाबाह्य मुलांचा प्रश्न

कोरोना महामारी व लॉक डाऊन च्या या काळात अनेक प्रकारांनी आपण त्रासलोय. अनेकांचे भरुन न  येणारे नुकसान झाले आहे. तर काहींसाठी लॉकडाउन मौजमजा आहे. एकीकडे काहींसाठी वर्क फ्रॉम होम ची सुविधा आहे. तर दुसरीकडे बहुसंख्य जनतेचे मात्र केवळ हाल आहेत. पोटा-पाण्याचा प्रश्न आहे.

या काळात सर्वांनाच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काहींचे काम बंद झाले, काहींचे पगार झाले नाहीत. जे काही नुकसान झाले ते झेलण्याची तयारी पण झाली. पण सर्वात जास्त नुकसान शैक्षणिक क्षेत्रात झालेले दिसून येत आहे. ज्यांच्याकडे सोयीसुविधा आहे त्यानी आपल्या पाल्यांच्या ऑनलाइन क्लासेस च्या माध्यामातून शिक्षणाचा प्रश्न सोडावयाचा प्रयत्न केला. यातूनच इंटरनेट चा अति वापर आणि पुढे याचाच गैरवापर असे प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्यांच्याकडे साधा फोन देखील नाही अशी मुले मात्र शाळा सुरु होण्याची वाट पहात आहेत.

अशी मुले शिक्षणापासून दुर होतील काय? ही भीती वाटत राहते. तसाही आपल्या देशात शाळाबाह्य मुलांचा मोठा प्रश्न आधीपासूनच आहे. दरवर्षी त्यात वाढ होते. यात आता लॉक डाऊन मुळे शाळा बंदी. सर्व मुलांबद्दल काळजी करावी अशी स्थिती आहे.

माहेरघर

मी म्हटलं, भावाच्या घरी आलेय. वर जाताजाता नेमकं तेच वहिनीला ऐकायला गेले... अरचू, भावाचे घर नाही, माहेरी आले म्हणा, शब्द महत्त्वाचे असतात... माहेरचा किस्सा मैत्रिणीला सांगत होती, ती म्हणाली, "कुछ भी बोल यार, भाई तो अच्छे हैं तेरे लेकिन दोनों भाभी भी अच्छी मिली.. तू बहुत लकी है ! बहुत नेक काम किए होंगे.....  मी जास्त काही बोलणार इतक्यात परत तीच म्हणाली, "तो हमने कौन से बुरे काम किए हैं..." अग, तुझे माहेर जवळ आहे एका गावात म्हणून असं म्हणत आम्ही विषय थांबविला. 

मी भाग्य वैगेरे मानत नाही. तिचा फोन ठेवल्यावर अनेक चेहरे आठवले, खूप चांगली माणसं तरीही कठीण प्रसंगी एकटीच असलेली. आपली मायेची माणसं असावी असे बहुतेक सर्वांना वाटत असेल, अगदी जवळ नसली तरी चालेल पण असावी. आटपाट नगराची गोष्ट आठवली? श्रीमंत भाऊ आणि गरीब बहिणीची. माझ्या बालपणी पुस्तके विकत घेण्याइतपत श्रीमंती नव्हती. आई वडिलांच्या कृपेने हुशारी जन्मजात मिळाली, मग काय? जे मास्तर शाळेत शिकवत ते सहज पाठ व्हायचं. बालवाडीत तर साऱ्या गावातील पोरं जमली तरी जो पर्यंत मी दिसत नव्हती बाईला शाळा भरल्यासारखे वाटत नव्हतं म्हणे. तेव्हापासून सवय, कोणीही म्हटलं ते गाणं / कविता म्हणून दाखव, आपलं सादरीकरण सुरू व्हायचं. आटपाट नगरच्या कथेने तर लय प्रसिद्ध केले होते. पैसे पण द्यायच्या आयाबाया. माझ्या आईसारखे अनेकांना ती आपलीच कथा वाटायची. त्यांच्या भावना कदाचित तेव्हा मला समजत नव्हत्या. माझ्यासाठी पाठीवर मिळणारी शाबासकी अन दहा वीस पैसे खूप जास्त होते. नंतर जेव्हा तर्क करू लागले तेव्हा ती कथाच कशी चुकीच्या पद्धतीने लिहिली हे समजलं. आजूबाजूच्या स्त्रियांना ती आपली कथा वाटायची कारण बहुतेक सर्वांना शिक्षण नाही वा नुसती अक्षरओळख, कमी वयात लग्न पण त्यांच्या भावाला मात्र घरच्यांनी शिकवले... शिक्षणाने खूप काही बदलतं.

मैत्रिणीसोबत माहेरच्या गप्पा मारल्या आणि मुली कितीही शिकल्या वा त्यांच्या घरी सुखात असल्या तरी, किती महत्त्वाचे असते माहेर नावाच घर याची जाणीव झाली. खरं तर घर तेच आहे पण रंगरंगोटी आणि सजावट यामुळे जवळपास वर्षभरानंतर वहिनी परत घरी रहायला आल्या. सगळं त्यांच्या आवडीने झाले असल्याने त्या जरा जास्तच खुश असणार यात शंका नाही. पण त्यांनी एकही फोटो मला काय पण सोशल मीडिया वर पण शेअर केला नाही. मी वारंवार व्हिडीओ कॉल वर घर पाहण्यासाठी प्रयत्न केला पण व्यर्थच. भाच्याला पण मला घराचे व्हिडीओ वा फोटो पाठवायला मनाई केली गेली. शेवटी मग नवीन वर्षाचे स्वागत सर्वांसोबत करायचे ठरवले. तिथे गेल्यावर समजलं की भावाने वहिनीला मला फोटो दाखवायला नाही म्हटलं होतं. मी घरी येवून स्वतः घर पहावं म्हणून सगळं... वहिनी तशी समजदार आहेच पण हे जरा जास्तच झालं, मला वाईट वाटलं की एवढं सजवलं पण माझ्यामुळे त्यांना डीपी पण नाही बदलता आला. मुलींना आपल्या घरी खरंच महत्व असावं म्हणजे मायबाप नसल्यावर सुद्धा माहेरघर उरतं. 

माझ्या बालपणी पुन्हा शाळा सुरू झाली की सगळ्या मैत्रिणी आत्या, मामा, मावशी, काका वा इतर कोणाकडे जाऊन काय मज्जा केली यावर बोलायच्या. मी मात्र कायम अश्या अनुभवापासून दूर. आईला एकच भाऊ अन बाबाला पण एकच भाऊ, मग वाटायचं आत्या / मावशी पाहिजे होती? गरिबांची लेकरं जरा लवकर समजदार होतात म्हणे, हळूहळू मला माझ्यापेक्षा आईचे वाईट वाटायचं. तिची कथा आटपाट नगराची. तिलाही वाटत असावं आपण जावे माहेराला?? तिला माहेरचं सुख नाही तर आम्हाला तरी काय ? पण ती अनेकांना मायेने योग्य मार्गदर्शन करायची, त्यामुळे सतत कुणीतरी घरी यायचे. एकदा असंच मला कोनी नातेवाईक नाही म्हणून मी रडली तर आपलंच घर बरं असते असे समजावत शेवटी म्हणाली की मला माय बहीण असती तर पाठवले असतं त्यांच्याकडं. 

असो, सासर वा माहेर याहीपेक्षा प्रत्येकाला विशेषतः त्या घरातील स्त्रीला ते घर "माझं" वाटणं महत्वाचे. नाहीतर काही दुखणे आले की जा आराम करायला माहेरी, असे नकोच. जिथं कुठे असो पण स्त्रीला सुख दुःख सगळं व्यक्त करता आले पाहिजे. तसं पाहिलं तर मुलं लहान असेपर्यंत असे माहेरी वा इतर ठिकाणी जाता येते पण एकदा का जबाबदाऱ्या वाढल्या की मग माहेरपण नुसतं दोन दिवसांचे पाहुनपण होऊन जाते. खरं तर आपल्या परंपरेने मुलगी माहेरी येणे म्हणजे खर्चिक बाब करून ठेवली आहे, म्हणजे तिला घ्यायला जाणे, साडीचोळी इत्यादी स्वागत. तिच्या जन्मापासून ती परक्याचे धन, लोकाच्या घरी जाणारं हे सगळेच तिला जन्मापासून परकं करून ठेवत असावं? एकदा का ती परकी ठरली तर मग तीचे हक्क अधिकार पण सहजपणे नाकारले जातात. अश्या अनेक बहिणी आहेत ज्यांनी वडिलोपार्जित संपत्तीचा हिस्सा घेतला म्हणून ती कायमची परकी झाली. संपत्ती वडिलोपार्जित वा स्वतः ची मिळकत, घर म्हणून ते सर्वांना आपलं वाटावं भलेही भाड्याच्या खोलीत राहत असलो तरी घर म्हणून मायेची ऊब सर्वांना मिळावी.

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

आठवणीतील सख्या...

आठवणी जाग्या झाल्या तर काल परवाची गोष्ट अन काळाच्या संदर्भात बोलायचं तर तब्बल पंधरा वर्षे...
तश्या आम्ही खुप खास मैत्रिणी. कुठेही दोघीच सोबत दिसायचो. कॉलेजच्या सुट्ट्यांचे दिवस सुद्धा आम्ही एकमेकींना पत्र लिहून सतत संपर्कात रहायचो. तिच्या वाढदिवसाला गिफ्ट माझेच अन पहिला फोनही माझाच, तो ही शेजारच्या लँडलाईन वर. 

कालांतराने थोड़ा बदल झाला. आम्ही पदवीचे शिक्षण घेत असतानाच ती एका मुलाच्या प्रेमात पडली. एवढ्या हुशार मुलीला धड दहावीत पास न होणारा, दारू पिणारा मुलगा आवडावा. तेही माझ्या सख्ख्या मैत्रिणीला😥. खुप वाईट वाटलं. पण पर्याय नव्हता. मैत्री तोडली तर कदाचित तीची वाट लागेल ही भिती. आता माझ्या ऐवजी त्याच्या पत्राची आणी भेटीची ती वाट पाहू लागली होती.

आम्ही एकाच वयाच्या तरी माझी समज माझ्या घरच्या वातावरणाची निर्मिती म्हणावी लागेल. आईकडे आजुबाजुच्या बायका आपली गार्‍हानी / घरच्या तक्रारी घेवुन यायच्या. (एम एस डब्लू ला आल्यावर समजले ते आईचे काउंसलिंग सेंटर होते, मोफत सल्ला केंद्र. आईकडे येनारया बाया अन आईचे सल्ले.. सोबत ठरलेले वाक्य यासाठी चांगले शिका लागते, शिक्षण आणि इज्जत खुप महत्वाची.) 

माझी मैत्रीण जेव्हा म्हणाली की आता 18 वर्षे पुर्ण झाली की लग्न करणार, तेव्हा मला धक्काच बसला. कारण आजुबाजुच्या समस्या या अश्याच लवकर लग्न अन मुले यामूळेच. खुप समजावले, शेवटी म्हटलं की मी स्वता येईल कोर्टात सही द्यायला पण आता नाही. निदान तो नाही तर तू तरी शिकलीच पाहिजे, नाहितर मी आणि बाकीचे सगळे शिकलेले, चांगल नाव असणार आणी तू काय करशील? हळूहळू तिच्याही लक्षात आलं. निदान भवितव्याच्या दृष्टीने विचार करुन शिक्षण महत्वाचं. मात्र ती ठाम, कितीही शिकली तरी लग्न याच्याशी करेल. शेवटी पहिल प्रेम. (या वयातल प्रेम म्हणजे अंधश्रद्धा😁😁 खात्री)

नंतर अजुन सहा वर्षे ती शिकत होती. यादरम्यान माझे क्षेत्र बदलले आणी शहर सुद्धा. तरिही आम्ही सम्पर्कात होतो. विशेष म्हणजे मी स्वता तिच्या सम्पर्कात राहिली. ती भविष्यात आर्थिकदृष्ट्या विसंबून असू नये, चांगले जिवन जगली पाहिजे यासाठी माझी धडपड.
ती शिकली, तिला समजले की ते फक्त आकर्षण होते, साहजिकच ते कमी झाले. त्याचा स्वभाव तिला समजला आणी प्रेम बीम ठीक पण लग्न नाही करायला पाहिजे. तिच्या घरच्यांच्या पेक्षा माझा राग. पहिला नाट मी लावला होता म्हणुन... 

ती नोकरी करायला लागली. निर्णय बदलला. 

शिक्षणाने समज वाढली आणी हळूहळू माझी गरज संपली. आता माझ्यामुळे काही अडत नव्हतेच. माझा नियम मी पाळला, जर आपल्यामुळं पुढच्या व्यक्तीचे काही अडत नसेल तर उगाच जागा अडवून ठेवू नये. नातं रक्ताचे असो वा मैत्रीचे नाहितर कामाचं ठिकाण जेव्हा आपली गरज नाही असं वाटतं तेव्हा तिथे उगाच थांबुन समोरच्याना जबरदस्तीने सोबत का द्यावी?
...
...
...

बुधवार, २८ जुलै, २०२१

आणि भुतदया नडली...


प्रत्येकाच्या संसाराची सजावट ही कायम लक्षात राहते, अगदी सुरवातीचे दिवस... असंख्य आठवणी.. कोणते सामान कधी अन कसे घेतले ? तेव्हा आलेल्या अडचणी आणी बरेच काही.

तशी यावर कधी विशेष चर्चा होत नाही पण काही गोष्टी मात्र अचानक आठवतात. माझ्यासारख्या भावनिक व्यक्तीला तर रडायला पण येते. गेले दोन दिवस असेच एक एक आठवत आहे. 

आमच्या कामाचा एरिया जवळ व्हावा म्हणून ज्यांचे घर ऑफ़िस साठी भाड्याने घेतले होते, तेथेच वरच्या दोन खोल्या रिकाम्या झाल्या आणि मागचा पुढचा विचार न करता आम्ही ती जागा रहायला घेतली. लग्नाला जेमतेम दिड वर्षे होत आले होते. आई पाहणी करण्यासाठी पाहुणी म्हणून आलेली. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या खोल्याना सिमेंटची पत्रे होती. आमच्याकडे पंखा नाही की कुलर नाही. 

यापूर्वी जिथे रहायचो ते घर मोठं आणि फ्लैट असल्याने पंखे वैगेरे सगळे ठीक होत. घरी पंखा असला पाहिजे हा विचार करायला वेळ अन पैसा दोन्ही नव्हता. तसा आमचा संसार पाहून ती खूश होती. सन्स्था नविन असली तरी काम पाहून अजुन तिला जरा जास्त आनंद झाला होता.

दुसर्या दिवशी बाहेर फिरायला गेली आणी येताना घरी लागणारं काही सामान घेवुन आली. पंखा पण आणला. भिंतीवर लावायचा. काही बोलली नाही. मी पण शांतच राहिले... तो उन्हाळा त्या पंख्याने सुसह्य केला म्हणायला हरकत नाही.

आता गेली साडेतीन वर्षे आमच्याकडे टीवी नाही. गाथा टीवी एंकरसोबत गप्पा मारायला लागली होती. मग काय ? बंद केला आणी किती दिवस बंद ठेवायचा या विचाराने माझ्या सखीला दिला.

लग्नानंतर जवळपास दोन वर्षं टीवी नव्हता आणि आम्हाला गरज पण वाटली नव्हतीच. पण आमचे दादा म्हणजे माझे मोठे दीर(घरी सगळे त्याना दादाच बोलतात) एकदा कर्जत वरुन आले. नविन टीवी आणी त्याची फिटिंग करुन देणारा माणुस घेवुन. नंतर केबलवाल्याकडे जावुन केबल पण बसवून घेतली. गरज नसली तरी टीवी आला आणी मग गरज बनला. टीवी अन पंखा सोडला तर बर्यापैकी सामान आम्ही दोघानी खरेदी केलेले.

जे सामान मला गरजेचे असेल कदाचीत दुसरया कुनाला ते सोईसाठी वाटेल. आम्हा दोघानाही कपडे धुण्याचे मशीन सगळ्यात गरजेचं आहे असे वाटले होते. पण घेणार कसं? जवळपास एक किलोमीटर अंतरावर माझे मोठे दीर रहायचे. ताई पण बोलताना म्हनाल्या की नविन मशीन घ्यायचं आहे. मग काय नवर्याला सान्गितलं दादांशी बोला. म्हनाव, हफ्ता देईल वेळेवर एक नाही तर दोन मशिनी घे. हफ्ताने परतफेड झाली मशीन घरी आली. पानी येण्याची वेळ खुप विचित्र होती, आम्ही बाहेर असायची पण ऑटोमेटिक मशीन असल्याने कपडे धुऊन तयार रहायचे.

या आठवड्यात दोन तीन दिवस पाण्याची कमतरता होती. पानी साठवायला काहिच सोय नाही. मग मशीन मध्ये पानी भरुन ठेवले. झाले... काल मशीन सुरु करते तर काहिच प्रतिसाद नाही. काहिच सुचत नव्हतं. तेव्हा कळलं की ही मशीन माझ्यासाठी किती महत्वाची आहे. जर मशीन दुरुस्त नाही झाली तर... नुसत्या विचाराने डोळ्यांत पाणी.. आम्ही एकमताने सोबत घेतलेली पहिली वस्तू म्हणजे ही मशीन..
मैकेनिक ला फोन केला. बघीतलं तर उंदरांने आतमधील वायर सगळी कुरतडली होती. 
उंदिर? बापरे म्हणजे पक्ष्याना पिण्याचे पाणी आणी खायला ठेवते.. तर.. त्या पक्षी अन खारूताई सोबत उंदिर पण येतात तर? 
चारएक हजार खर्च येईल. बापरे? मनात आलं महिनाअखेर, खाते रिकामे.. पण.. मशीन नसेल तर? बाकी एवढे काम करते ते काय कमी आहेत की काय? माझ्या हातचे कपडेधुलाई व्यवस्थीत नाही. काहीही झाले तरी मशीन दुरुस्त झाले पाहिजे. बस्स..

गुरुवार, २४ जून, २०२१

टेकू आणि झाड



पावसाळा सुरू झाला की कुत्र्याच्या छत्र्या आणि टेकू बऱ्यापैकी सर्वत्र दिसतात. जसजशी माहितीत भर पडली तेव्हा कळले कुत्र्याची छत्री नव्हे तर इंग्रजीतील मशरूम आहेत! या पावसात वाढतात व काही दिवसात संपतात. आणि टेकू? सांगते! घरी आई कारले, वाल अशी वेल लावित असे. बिया पेरल्या, कोंब आले, पाने फुटली कि त्यांना लगेच 'टेकू'च्या सहय्याने तो वेल मांडवावर पोहचवला जाई. लहानपणी या कुत्र्याच्या छत्र्या व टेकू यांचे फार कौतूक वाटायचे.  

हा 'टेकू' जोपर्यंत तो वेल मांडवावर व्यवस्थित जात नाही तोपर्यंत या 'टेकू'चे फार महत्व. त्याची वेल वर जाईपर्यंत विशेष काळजी पण घेतली जायची. पण एकदा का वेल वर मांडवावर पोहोचला रे पोहचला आणि त्याला टेकूची गरज नाही, असे दिसले की मग त्याच्याकडे कुणाचे फारसे लक्ष जात नसे. 'टेकू' कधी 'पडला' हे ही कधी कधी समजत नव्हते!
 
असे असले तरी 'टेकू' फार महत्त्वाचा. वादळी वारे वा जोरदार पावसाने जेव्हा रोपटी वा फांद्या तुटल्या जातात तेव्हा हे टेकू मदतीला असतात. एखाद्याचे घराचे छत कमजोर झाले, पडायला आले तर मजबूत बल्ली किंवा मेढ 'टेकू' म्हणून वापरतात. या बल्लीला म्हणजे 'टेकू'ला कोणी टेकून राहणे तर दूरच पण त्याच्या जवळ ही भटकत नाही. घराला झाडून साफ करताना वा सारवन करताना सुद्धा किती या 'टेकू'ची काळजी! 

घराच्या बाबतीत मात्र या 'टेकू'ला जरा जास्त महत्त्व दिले जाते. पडके घर आणि टेकू यांचे नाते अतूट. 'टेकू' काढला तर घर पूर्ण पडेल. मग घर पडले तर काय? टेकू आपोआपच निकामी! 

खरे तर 'टेकू' म्हणजे 'आधार' असा सरळ अर्थ आहे. पण मानवी वृत्तीचा विचार करता अनेक प्रकारचे 'मानवी टेकू' दिसून येतात. जसे पावसाळ्यात वेलींना व पडक्या घराला टेकू खूप महत्वाचा तसे काही टेकू राजकीय वा सामाजिक जीवनात देखील भेटत असतात. 

'राजकीय युती' ही कमजोर छपराला असलेल्या 'टेकू'ची आठवण करुन देते. कधी युती तुटेल म्हणून दोघेही गट एकमेकाना बिल्कुल दुखावणार नाहीत! अशा युतीत मन रमविणाऱ्या काही टेकूना सतत वाटत असतं कि आपण खूप महत्त्वाचं काम करीत आहोत. त्यामुळे जिथे कुठे कमकुवतपणा दिसला तिथे जाऊन टेकूची भूमिका घेऊन आपला मोठेपणा सिद्ध करायचा प्रयत्न करतात. पण जसं 'ओझं' होतंय असं दिसले कि लगेच काढता पाय घेतात. असो.

काही टेकू भल्यासारखे असतात. स्वतःचा उपयोग दुसऱ्याला शिडी सारखा करतात. काही मजबूत खांबासारखे असतात, जुन्या कमजोर झालेल्या खांबाची जागा घेतात छत टिकवून ठेवतात! एखाद्या झाडाच्या फांद्या मोठ्या झाल्या त्या तुटू नये, झाड पडू नये म्हणून त्या फांद्यांना देखील टेकू लावतात! सामाजिक संगठना मध्ये असे टेकू देखील आवश्यक ठरतात. 'टेकू'त जर क्षमता असेल आणि त्या आधाराने काही भले होणार असेल तर मनुष्य प्राण्याने असा 'टेकू' बनणे चांगले! निश्चित बनावे. पण नेहमी स्वतःला टेकू बनवत राहण्यात काही अर्थ नाही. आणि कायम टेकू च्या आधारावर दिवस काढणे पण ठीक नाही. कारण टेकू म्हणजे केवळ निर्जीव आधार. 

मला वाटते जर सजीव आहोत तर मोठे 'झाड'च बनले पाहिजे! असे झाड ज्याच्या अंगा खांद्यावर पक्षी व प्राणी खेळतात, फुले-फळे चाखतात, विसावा घेतात! हेच पक्षी प्राणी त्या झाडाच्या बिया पसरवतात. झाडाच्या फांद्यांवर प्राणी पक्षीच नाही तर प्रसंगी परजीवी वेली देखील मोठ्या होतात. पण कालांतराने त्या संपून जातात. असो. 

पण झाड हे झाड राहते. या झाडाचे आयुष्य संपले म्हणजे ते 'निर्जीव' झाले कि त्याचे लाकूड इमारतीला, उद्योग अवजारांना व काही 'टेकू' म्हणून तर काही सरपण! हे साहजिकच आहे.

सोमवार, २१ जून, २०२१

बालसन्गोपनाचे किस्से

===

लवकरच गाथा चार वर्षांची होईल. जवळपास गेले वर्षभर आठवडा-दोन-आठवड्यात का होईना पण किमान एक तरी व्यक्ती अशी असतेच जी तिच्या शाळेबद्दल चौकशी करते. अजून शाळेत नाव नाही घातले (टाकले) म्हटल्यावर निदान ऑनलाइन क्लासला तरी बसवायला पाहिजे असा सल्ला आवर्जून असतो. सर्वच पालकांना आपल्या पाल्यांच्या बाबतीत काळजी आहे. लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते. त्यापोटी नेहमी आम्हाला गाथाबद्दल सूचना व मार्गदर्शन मिळत असते. गाथा ची शाळा हा आमच्या घरातला सध्या चर्चेचा विषय! आत्ता कुठे चार वर्षांची होत आहे ती! 

खरं तर एवढ्या लहान मुलांना शाळेत? ते ही पुस्तके, वह्या, शाळेचा घरचा अभ्यास, प्रसंगी बाहेरची शिकवणी? हा सगळा विचार केला कि डोकं जड होतं. सकाळी-सकाळी तीन-चार वर्षांची (आता तर अडीच वर्षांची देखील) मुले आपल्या आईवडिलां सोबत किंवा शाळेच्या बस/ व्हॅन ने शाळेला जाताना दिसली की वाटते - इतक्या लहान मुलांना कशाला हवी शाळा?
 
आधीच चौकटीतले जिवन जगणारे आपण! त्यातही आता स्पर्धेच्या युगात आहोत म्हणून मुलांचे बालपण खेळण्यासाठी असते हे त्यांना उमगण्याच्या आतच त्यांच्याकरीता देखील चौकटी आखून त्यांना वेळापत्रकात बसवून मोकळे होतो. मुलांची चौकट म्हणजे शाळा, शाळेतील अभ्यास, घरचा अभ्यास, बाहेरची शिकवणी हे ठरलेले आहे. आमच्या शेजारी ताई लहान मुलांची शिकवणी घ्यायच्या. त्यांच्या शिकवणीत सगळी मुले तीन ते सहा वर्ष गटातील. 

या शिकवणीत देखील आता वेगवेगळे प्रकार आहेत. आई वडिलांना आवडतं, त्यांची इच्छा आहे  म्हणून नाच गाणे किंवा इतर कोणतातरी क्लास (शिकवणी). अशा क्लासला जाणाऱ्या मुलांना विचारले तर सांगतील कि आई किंवा वडिलांनी या क्लासला टाकले. मुलांचे पालक म्हणतांना दिसतात कि "आम्ही नाही करु शकलो आवड असून देखील, म्हणून आमचे स्वप्न मुलं पूर्ण करतील." आपली स्वप्ने आपण लादतोय असे हे पालकांना लक्षातही येत नसेल काय?

शिकवणी च्या आधी विषय सुरु झाला होता शाळेचा. प्रश्न आहे की मुलांना कोणत्या वयात शाळेत पाठवायचे? कधी शिकवणी सुरु करायची? मी प्राथमिक धडे गावातल्या शाळेत घेतले. तिथे बालवाडी होती. केजीबीजी शहरात होती. त्यामुळे याच्याशी आमचा संबंधच नव्हता. बालवाडीत मस्त खेळ, गाणी, गमती-जमती आणि हसणे-खेळणे. अक्षर ओळख कशी झाली ते कळलंच नाही. सहा वर्षांचे असताना पहिली. स्पर्धा वैगेरे फारशी माहितीच नव्हती. थोडक्यात काय दडपण दबाव नव्हता.

आपण आजुबाजुला पाहिले तर अनेक अधिकारी पदावर वा विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्ती आवर्जून उल्लेख करतात कि, ते किती खडतर परिस्थितीतून पुढे आले. गावात, सरकारी शाळेतील वा छोट्या शाळेत शिकलोय. पण हेच जे स्वतः छोट्या शाळेत शिकले अन मोठ्या हुद्द्यावर पोहोचले, त्यांना आता वाटतेय की इंटरनॅशनल, मोठ्या स्कुल मधील शिक्षण चांगले! हा विरोधाभास का? 

लहान मुले काय केले तर जीवनात पुढे जाऊ शकतात यशस्वी होऊ शकतात यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन बालपणा पासून समजून घ्यावे लागेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या बालपणी फार खट्याळ होते, खूप खेळायचे, खोड्या करायचे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः सांगितले कि पदवीधर होईपर्यंत त्यांच्या हातून काही महत्त्वाचे काम होईल असे त्याना वाटत नव्हते. तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर आज जगातील काहीच परंतु अत्यंत विद्वान, नैतिक व क्रांतिकारी महान व्यक्तींपैकी एक म्हणून जगाच्या इतिहासात अजरामर, अनुसरणीय व अत्यंत सन्माननीय आहेत. 

असे कसे घडले? बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र वाचले तर पटते कि निश्चितच योग्य वयात योग्य माहिती व शिकवण मिळाली तर नक्कीच व्यक्तीचे आयुष्य महान बनू शकते.