शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

आणि म्हणे स्त्रिया सक्षम झाल्या...

एक मैत्रीण दवाखान्यात आयाचे काम करणारी… (… मावशी), वय 30 वर्षे. शाळेत आठवीमध्ये शिकत असतांना तिच्यापेक्षा तेरा वर्षे मोठ्या पंधरावी शिकलेल्या मुलाशी लग्न झाले. आज ती दोन मुलींची आई, मोठी मुलगी दहावित शिकते. गेली पाच – सहा वर्षे नवरा काहीच काम करत नाही, त्याला वेड लागले म्हणतात. वेडा असला तरि ती उशिरा आलेली चालत नाही, रोज दारू पाहिजेच. तिच्याच आईच्या घरी एका खोलीत संसार करते, मूलींना शिकून मोठे करायचे स्वप्न पाहते. सर्वांचा खर्च कसाबसा तीच करते. तरिपण त्याचे सर्व.... सहन करते. त्याला सोडावे असे तिला वाटत असले तरि तिची आई तिला विरोध करते. कारण काय तर म्हणे शेवटी नवरा आहे, तोच तुला म्हातारपणीचा आधार.... स्वत: मेहनत करून, कष्टाची कमाई खात असली तरि तिच्या जिवनाचा निर्णय ती घेवू शकत नाही.
दुसरी सुशिक्षित व्यवसायाने डॉक्टर. नवरा सुद्धा अभियंता भरपूर कमावतो. दोन मुले, घरी सर्वच सुविधा उपलब्ध म्हणजेच सुखी कुटुंब. दर दोन - तीन दिवसानी मोठ्याने भांडणाचा आवाज, तिच्या आई - बहिनीवरून तिला शिव्या. जीव वाचविण्यासाठी त्या रात्री शेजारी मैत्रिणीकडे ती आधार घेणार, सगळे शांत होण्याची वाट पाहणार. सामाजिक प्रतिष्ठा म्हणून त्याला सोडू शकत नाही. . . या अश्या कितीतरी मैत्रिणी कोणत्या न कोणत्या कारणाने अपमानाचे जिणे जगत आहेत. काय हि समस्या नाही ? काय या व्ययक्तिक समस्या आहेत ? कोण अश्या विकृत पुरुषी मानसिकतेला दंड देणार आणि कोण तिला मानसिक / भावनिक आधार देणार ? काय हे समाजाचे काम नाही.?  
एकीकडे एकुलती एक मुलगी म्हणून तिला हवे ते द्यायचे. समाजात प्रतिष्ठा, आदर्श निर्माण करायचा आणि अपेक्षा करायची कि तिला तिचे निर्णय स्वत: घेवू देणारा जीवनासाथी मिळावा. त्याचवेळी आपल्या पत्नीला काही येत नाही असे गृहित धरून तिला निर्णय घेण्यापासून परावृत्त करायचे. . काय एक मानव म्हणून आपण एकमेकांचा आदर करणार आहोत ? 
 म्हणे स्त्रिया सक्षम  झाल्या.      

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

किंमत मोजल्याशिवाय परिवर्तन संभव नाही

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या संदेशास स्त्रियांच्‍या उत्‍थानासंदर्भात समजून घेतांना... 

भारतीय समाजातील स्त्रियांच्या परिस्थितीवर नेहमीच लिहिले जाते, चर्चा केल्या जातात. याबाबत अग्रेसर असणारी प्रसारमाध्यमे नेहमी प्रचार करतात की आज भारतातील स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत. सततच्या अशा प्रकारच्या प्रचारामूळे सगळया स्त्रियांचा विकास झाला आहे असे वाटू लागते अर्थात तसा भ्रम निर्माण होतो आणि हजारो वर्षे विकासापासून वंचित असलेल्या बहुजन समाजातील स्त्रियांची परिस्थिती आजही बदललेली नाही, यावर सोयीस्‍करपणे पडदा पाडला जातो. जातीव्यवस्थेमुळे स्त्री त्यातही बहुजन समाजातील स्त्री ही कायम मागासलेली आहे या बाबीवर चर्चा होत तर नाहीच त्‍याचबरोबर त्या आजही शिक्षण, रोजगार, आरोग्याच्या सुविधा अशा अनेक मुलभूत अधिकारांपासून वंचित आहेत इकडेही लक्ष जात नाही. अशा स्थितीत आपल्‍यावर येणाऱ्या असंख्‍य अडचणींवर मात करीत, परिस्थितीला सामोरे जात काहीजणी आपले कुटुंब सांभाळून समाजाचे प्रतिनिधित्व करतांना दिसून येतात. ही जरी जमेची बाजू असली तरी हे प्रतिनिधित्‍व वाढवत नेऊन शोषित वर्गातील समस्‍त स्त्रियांचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी काम करावे लागेल हे सत्‍य स्‍वीकारावे लागेल.
स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाच्‍या दृष्‍टीने विचार केल्‍यास सर्वप्रथम लक्ष जाते ते त्‍यांना भेडसावणाऱ्या असंख्‍य समस्‍यांकडे. मग त्‍या समस्‍या घरातील असोत, वस्‍तीतील असोत अथवा समाजातील, स्त्रीच्‍या समस्‍या अपार आहेत. कुटुंबाचे, जातीचे, धर्माचे व परिस्थितीचे बंधन म्हणून जे काही शालेय शिक्षण तिला मिळते ते एक तर विकासाच्‍या दृष्टिकोणातून अपूरे असते आणि त्‍यात भर म्‍हणून की काय परंपरेतून तिची जी जडणघडण होते ती तिच्‍यासाठी संकटे निर्माण करणारी ठरतात व ती अनेक अत्‍याचारांना बळी पडते. अशी कोणती यंत्रणा आढळून येत नाही की जी स्‍त्रीला स्‍वतंत्र करेल, नव्‍या जगाच्‍या निर्मितीची तीची जी जबाबदारी आहे ती पेलण्‍यासाठी तिला सक्षम करेल. फुले-आंबेडकरी विचारधारेमध्‍ये स्‍त्रीला स्‍वतंत्र करणारे संपूर्ण मार्गदर्शन आहे. परंतु ते अंमलात आणण्‍याची म्‍हणजेच प्रत्‍यक्ष कृतीत उतरविण्‍याची जबाबदारी कोण घेणार? हा खरा प्रश्‍न आहे.
परंतु आज स्‍त्रीच्‍या पोटी सुदृढ बाळ जन्‍माला यावे किंवा स्‍त्री-पुरुष असमतोल होवू नये म्‍हणून यंत्रणा झटतांना दिसतात. सरकारी किंवा एनजीओंच्‍या आरोग्‍य विषयक यंत्रणा याकरीता मोठा खर्च करतांना दिसतात, मोठया-मोठया पंचतारांकीत चर्चासत्रांचे आयोजन करतात. परंतु तिच्‍या मानसिक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक, कलाकौशल्‍यगुण अशा सर्वांगिण विकासासाठी काम करण्‍यासाठी यंत्रणांचे हात अखडतात, थरथरतात. स्‍त्रीवर कुटुंब व समाज घडविण्‍याची जबाबदारी आहे असे म्‍हंटले जाते परंतु ती तीची ही जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम व्हावी यासाठी यंत्रणांची शोधाशोधच करावी लागते.
अशा स्थितीत, जीवन जगतांना स्‍त्रीवर टाकण्‍यात आलेल्‍या जबाबदाऱ्या, तिला अस्तित्‍वासाठी करावा लागणारा संघर्ष, तिच्‍या वाटयास येणारी मानहानी या सर्वांना तोंड देत-देत ती फक्‍त जीवन जगत असते. आणि मग नशीब, दैव, कर्मकांड याच्‍या आहारी जाते. साहजिकच अशा प्रकारे जीवन जगणाऱ्या स्‍त्रीची येणारी प्रत्‍येक पिढी सुद्धा तिच्यासारखीच आपले नशीब वाईट मानून वाट्याला आलेले अपमानाचे जिवन जगते. या संदर्भात फुले-आंबेडकरांनी जे मार्गदर्शन केले आहे ते समजून घेतले तर आपल्‍याला सन्मानाचे मानवी जीवन आणि प्रत्‍यक्षातील अमानवीय जीवन याची तूलनात्‍मक प्रचिती येते. परंतु हे केवळ वैचरीक न राहता फुले-आंबेडकरांनी केलेले मार्गदर्शन प्रत्‍यक्षात कृतीत आणण्‍यासाठी कार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे.
ही बाब लक्षात घेऊन आपल्‍या मार्गदात्‍यांनी केलेल्‍या मार्गदर्शनाला समजून घेत-घेत आम्‍ही काही महिलांनी “क्रांतिज्योती” या नावाने पुण्‍यात एक ट्रस्‍ट स्‍थापन केला. आम्‍ही आमच्‍या कामाचे क्षेत्र ठरविले. त्‍यासाठी आम्‍ही सहा महिने, वर्षभराची योजना बनवून कार्यक्रम आखणी करुन त्‍यावर रोज अंमल करतो. म्‍हणजेच आम्‍ही केवळ विशिष्‍ठ दिवशी किंवा वेळी आयोजित कार्यक्रमापुरते मर्यादीत नसतो तर सततच्‍या प्रक्रियेत आम्‍ही स्‍वतःला गुंतवून घेतले आहे. या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळ्याजणी रोज आमच्‍या कार्यालयात एकत्र येवून कार्यालयीन वेळेत कामे करतो. “क्रांतिज्योती” या नावाने आम्‍ही करीत असलेले कार्य हे एक “मॉडेल” म्‍हणून आम्‍ही विकसीत करीत आहोत.
या अंतर्गत आम्‍ही आमचे कार्य मुख्‍यत्‍वे दोन भागात विभागलेले आहे. महिलांना त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या, कुटुंबाच्‍या व समाजाच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी नेतृत्‍वविकासाचे प्रशिक्षण. तसेच आर्थिक समस्‍यांतून बाहेर निघण्‍यासाठी कौशल्‍याधारीत व्‍यवसायिक प्रशिक्षण आणि व्यवसाय उभे करण्‍यासाठी सहकार्य. नेतृत्‍व विकास प्रशिक्षण हा जरी सतत चर्चेत येणारा शब्‍द प्रयोग असला तरी आम्‍ही देत असलेले प्रशिक्षण हे फुले-आंबेडकरांच्‍या विचारधारेवर आधारीत आहे. याचा एक अभ्‍यासक्रम आम्‍ही बनविला आहे. आम्‍ही ‘‘क्रांतिज्‍योती स्‍टडी अॅंड ट्रेनिंग सेंटर’’‘‘रमाई व्‍होकेशनल ट्रेनिंग अॅंड बिजनेस सेंटर’’ असे दोन प्रकल्‍प सुरु केले आहेत. अर्थार्जनसाठी व्‍यवसाय करणाऱ्या महिलांच्‍या उत्‍पादनांना बाजारपेठ मिळवून देण्‍यासाठी आम्‍ही “ब्‍लू बर्ड्स” या नावाने वस्‍तूविक्रिकेंद्र (शॉप) सुरु केले आहे. आमच्‍या प्रत्‍येक कामाचे आम्‍ही आमच्‍यापरीने डॉक्‍यूमेंटेशन म्‍हणजेच दस्‍तावेजीकरण करीत असतो.
आमचे हे कार्य अनेक परिस्थितींना सामोरे जात, समस्‍यांवर मात करीत आम्ही सुरु केले आणि पुढे नेत आहोत. आज पुण्‍यातील येरवडा, विश्रांतवाडी परिसरातील ५०० पेक्षा जास्त कुटुंबांशी आम्‍ही संवाद साधला. ६०० पेक्षा जास्‍त महिलांचे संघटन करीत आहोत. ४० पेक्षा जास्त महिला स्‍वंयस्‍फुर्तीने स्‍वयंसेवक म्हणून काम करतात. यातील बऱ्याच महिला २७ स्वयंसहाय्यता गट, २ व्यवसाय गटांत कार्यरत आहेत. व्यवसाय प्रशिक्षणातून तयार झालेल्या महिला रोजगार मिळवित आहेत. ज्या महिलाना स्वत:चे नाव सांगायला सुद्धा भीती वाटत असे त्या आज ७०-८० लोकांसमोर उभे राहून मनोगत व्यक्त करतात, बहुजन समाजाच्या, स्त्रियांच्या समस्यावर बोलतात, महापुरुषांचे विचार कृतीत उतरवित आहेत. एवढेच नाही तर आपल्‍या समस्‍या जर सरकारी कामाशी संबंधीत असतील तर त्‍यासंदर्भात अर्ज लिहितात, आपल्या वस्तीतील समस्या सोडविण्‍याचा प्रयत्‍न करतात, मुलींचे व मुलांचे अभ्यासवर्ग घेवून त्यांचे भवितव्य उज्ज्वल बनविण्यासाठी झटतांना दिसतात. या सर्वांमागे बहुजन समाजाच्‍या महानायिका व महानायकांची प्रेरणा आहे. बहुजन समाजातील महानायक महानायिकांनी सतत महिलांच्या प्रगतीवर भर दिला आहे. या कार्याप्रती आम्‍ही समर्पित आहोत.
हे सर्व कार्य संघटीत व सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नांची मागणी करते. हे संघटीत व सातत्‍यपूर्ण कार्य करीत असतांना अनेक साधन-संसाधनांची नेहमी जमवाजमव करावी लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे कि किंमत मोजल्‍याशिवाय परिवर्तन संभव नाही. येथे किंमतीचा अर्थ हा वेळ, बुद्ध‍ि, कौशल्‍य, संसाधने व रुपये यांच्‍याशी संबंधीत आहे. एखाद्या मंडळाच्या माध्यमातून जेव्हा जयंती किंवा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो तेव्हा त्यासाठी त्या मंडळाची वर्गणी गोळा करतांना किती दमछाक होते, यावरुनच आम्ही महिला हे सगळे कसे सांभाळतो याचा आपण अंदाज करू शकता.
वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे आम्‍ही “क्रांतिज्योती” हे एक मॉडेल म्‍हणून विकसित करीत आहोत. जेथे अनेक महिला कार्य करतील. केवळ शहरी भागातच नव्‍हे तर ग्रामिण भागातही हे मॉडेल कशाप्रकारे अमलात आणता येईल याचा प्रयत्‍न आम्‍ही करीत आहोत. महिलांचे जे संघटन (संघटना नव्‍हे) आम्‍ही घडवित आहोत व जे काही प्रयत्‍न आम्‍ही करीत आहोत त्या प्रयत्नांना आलेले यश हे जे-जे लोक क्रांतिज्‍योतीच्‍या कार्यालयाला भेट देतात त्‍यांना अनुभवास येते. गेली दोन वर्षे सतत आम्ही सगळ्याजणी काम करीत आहोत. क्रांतिज्‍योतीच्‍या कार्यालयात सात जणी वेगवेगळया जबाबदाऱ्या सांभाळतात. कार्यालय म्‍हंटले की अनेक बाबींचा खर्च हा होतोच. मग ते कार्यालयाचे भाडे असो, लाईटबील असो, टेलिफोनचा खर्च असो, स्‍थानिक प्रवास खर्च, स्‍टेशनरी, आकस्किम खर्च असो, कार्यालयात काम करणाऱ्या मैत्रिणींचे मानधन असे अनेक खर्च आहेत ज्‍याकरीता आम्‍हाला नेहमी आर्थिक जमवाजमव करावी लागते. प्रत्‍येक महिन्‍याच्‍या पहिल्‍या व शेवटच्‍या आठवडयात आम्‍हाला याकरीता प्रचंड मेहनत करावी लागते. अनेक लोकांना भेटावे लागते. महिन्‍यातील कामाच्‍या चार आठवडयांपैकी जर दोन आठवडे या मध्‍येच जायला लागले तर अपेक्षित रिझल्‍ट अपेक्षित वेळेत यायला अनेक अडचणी येतात.
हे सर्व करीत असतांना जेव्‍हा आम्‍ही समाजाकडे बघतो तेव्‍हा हे जाणवतेच की आपले महानायक फुले-आंबेडकरांच्‍या महान कार्यामुळे, चळवळीमुळे समाजात एक असा वर्ग निर्माण झाला आहे की ज्‍याच्‍या भौतिक गरजांची पूर्तता झाली आहे. केवळ एवढेच नाही तर त्‍याहीपेक्षा आता त्‍यांची खरोखरीच चंगळ झाली आहे असे म्‍हंटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्‍येक शहरात कमीत कमी हजार-पाचशे जण असे असतात की ज्‍यांनी वर्षाकाठी दहा हजार रुपये जरी आपल्‍या चंगळवादातून बाजूला काढले तरी वर्षाकाठी ५० लाख ते १ कोटी रुपये सहज निर्माण होवू शकतात. महानगरांमध्‍ये तर हा आकडा प्रचंड मोठा होवू शकतो. आज जे काही चळवळीचे कार्य सुरु आहे ते खऱ्या अर्थाने ज्‍यांना समस्‍येची जाणीव आहे त्‍यांच्‍या आर्थिक योगदानाच्‍या जोरावर सुरु आहे. नमूद करण्‍यासारखी बाब ही आहे की समस्‍येची जाणीव असणारा जो वर्ग आहे तो स्‍वतःच इतका समस्‍यांनी ग्रस्‍त आहे तरीही तो त्‍याच्‍या परीने कोणताही कार्यक्रम असो मग तो जयंतीचा कार्यक्रम असो, सामाजिक असो, धार्मिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, प्रबोधन असो, साहित्‍य असो किंवा संघर्ष असो मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतो. कारण या कार्याचे महत्व त्यांना पटलेले असते. समाजात यावर्गाव्यतिरिक्त दुसरा वर्ग असा देखील असतो की त्याला वाटत असते की सचोटीने व इमानदारीने कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्‍हावेत. परंतु या करीता साधनसंसाधनांची आवश्‍यकता असते ही बाबदेखील आपण समजून घेतली पाहिजे.
 आम्‍ही महिलांनी जे कार्य हाती घेतले आहे, जे मॉडेल निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही करीत आहोत त्‍याला आपल्‍या सर्वांच्‍या मदतीची विशेष म्‍हणजे आर्थिक मदतीची अत्‍यंत आवश्‍यकता आहे. प्रत्‍येक तालुक्‍यात महिलांचे पाच हजार लोकसंख्‍येनुसार सात-आठ जणींचे दोन-तीन समूह जरी रोज योजनाबद्ध पद्धतीने कार्य करु लागले तर मोठे परिवर्तन येणाऱ्या काळात घडू शकेल यावर आमचा विश्‍वास आहे. परंतु याकरीता केवळ शाब्दिक मार्गदर्शन नव्‍हे तर प्रत्‍यक्ष सहकार्याची आवश्‍यकता आहे. जर आपल्यात खरोखरच सहकार्याची भावना निर्माण झाली तर कृपया अधिक माहितीसाठी www.krantijyoti.org ला भेट द्या.  

शनिवार, ७ जानेवारी, २०१२

ओवी सावित्रीची

पहिली माझी ओवी ग ! सावित्रीच्या बुद्धीला !
स्त्रियांच्या शिक्षणाचा ! पाया तू घातला !
अशिक्षित अडाणी तू ! पतीपाशी शिकली !
मुलींसाठी पहिली ! शाळा तुम्ही काढली !!

दुसरी ओवी गायिली ! तुझ्या ग धैर्याला !
दगडगोटे खाऊनी ! चालवली तू शाळा!
घराबाहेर काढले ! गुंडानी अडविले !
धीराने तोंड दिले ! सगळ्या ग त्रासाला !!

तिसरी माझी ओवी ग ! तुझ्या मोठ्या मनाला !
फसलेल्या विधवेचा ! सांभाळ तू केला !
अबला नि अनाथांचे ! मायबाप होऊन !
यशवंत बाळाला ! दत्तक घेतला !!

चौथी ओवी गायिली ! तुझ्या थोर हृदयाला !
माणुसकीचा झरा ज्यात ! नित्य ग वाहिला !
जोतबांची सावली ! नाही तू राहिली !
सत्यधर्मप्रकाशात ! तेजानं तळपली !!

दुःखितांच्या सेवेत ! देह तू ठेविला !
स्मरण तुझे करूनी ! वसा मी घेतला !
भगिनींना जागवीन ! संघटित करीन !
ज्ञानज्योत लावीन ! हेच तुला नमन !!

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

“प्रिव्हेंशन ऑफ अँट्रॉसिटिज अ‍ॅक्ट” ही ‘त्यांना’ समस्या का वाटते?

मिर्चपुर जातीय अत्‍याचार
      नुकताच दिल्ली विशेष न्यायालयाने “प्रिव्हेंशन ऑफ अँट्रॉसिटिज अ‍ॅक्ट” अंतर्गत चालविल्या गेलेल्या मिर्चपुर जातीय अत्याचार खटल्याचा निकाल दिला. २१ एप्रिल २०१० रोजी हरियाणातील मिर्चपुर गावातील जाट जातीच्या ९८ लोकांनी वाल्मिकी या अनुसूचित जातीच्या वस्तीवर हल्ला केला होता. या जातीय हल्ल्यात ७० वर्षीय ताराचंद व त्यांच्या अपंग मुलीला जीवंत जाळण्यात आले होते. हा जातीय अत्याचार असल्याने या गुन्ह्याची नोंद “प्रिव्हेंशन ऑफ अँट्रॉसिटिज अ‍ॅक्ट १९८९” नुसार करण्यात आली.
      हा खटला सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत वर्ग केला होता. या विशेष न्यायालयातील न्यायाधीश डॉ. कामिनी लाऊ यांनी या खटल्यावर निकाल दिला. निकाल देतांना “अँट्रॉसिटिज अ‍ॅक्ट” मध्ये बदल करुन तो जातीनिरपेक्ष करावा अशी सुचना त्‍यांनी दिली. या सुचनेमध्ये डॉ. लाऊ यांनी म्‍हंटले की दलित व आदिवासींवर सवर्णांनी अत्याचार केले तर तो अपराध ठरविणारा व त्यासाठी शिक्षेची तरतूद करणारा हा कायदा बदलावा व तो जातीनिरपेक्ष करावा.

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११

देवदासी सोडण्याची कारणे

"देवदासी शोध आणि बोध" या वसंत राजस लिखित पुस्तकातील हे एक प्रकरण. या पुस्तकात लेखकाने देवदासी या अनिष्ट प्रथेवर सर्व अंगानी प्रकाश टाकला आहे. सामाजिक बदलासाठी काम करणार्‍या सर्वांनी अभ्यासावे असे हे संग्रही पुस्तक आहे. आजही काही विशिष्ठ समाजात अंधश्रद्धेमुळे आपल्या मुला-मूलींना देवाला सोडण्यात येते. या कृत्याला कायद्याने बंदी असली तरी काही लोकं आपल्या स्वार्थासाठी या अशा रुढी-परंपरांना जीवंत ठेवण्याचे काम करतात आणि अशिक्षीत,अज्ञानी समाज त्याला बळी पडतो.या प्रकरणात लेखकांनी देवदासी सोडण्याच्या धार्मिक,सामाजिक आणि आर्थिक कारणांवर माहिती दिली आहे.







शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११

बौद्धांच्या ब्राह्मणीकरणाला जबाबदार कोण?

१४ ऑक्टोबर १९५६ अशोकाविजयादशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो शोषित, पिडित अस्पृश्य बांधवांना विषमतेवर आधारित ब्राह्मणीधर्मातून बाहेर काढून समानतेवर आधारित बौद्ध धम्माची दिक्षा दिली. त्यांनी धम्मदिक्षेसोबत २२ प्रतिज्ञा दिल्या. तेव्हाच्या शोषित, पिडित अस्पृश्य बांधवांनी या बदलाचा स्विकार सुद्धा केला. २२ प्रतिज्ञांचे पालन करण्यासाठी आपल्या घरातील दगड-धोंड्याचे देव फेकून दिले, स्वतः अशिक्षित असले तरि या पिडित समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले तत्त्व “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” आत्मसात केले. आपल्या मुलांना शिक्षण दिले, त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सहन केले, मोलमजुरी केली पण मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिली. तसेच अन्न, वस्त्र निवारा या मुलभुत अधिकारासोबत शिक्षणाचा सुद्धा अधिकार दिला. शिक्षणामध्ये फि माफी, शिष्यवृत्ती मिळाली. शिक्षण मिळाले, नोकर्‍या सुद्धा मिळाल्या, काहींनी व्यवसाय केले, अशा विविध मार्गाने या शिक्षित लोकांकडे आर्थिक सुबत्ता आली. ब्राह्मणी धर्मव्यवस्थेने ज्यांना समाजात चपलेचे स्थान दिले होते, त्यांना या धर्मांतरामुळे सन्मानाचा जिवनमार्ग मिळाला.

मानसिक दडपणातून घडणार्‍या आत्महत्या की सामाजिक हत्या?


दैनंदिन वर्तमानपत्र वाचत असतांना एखादी तरी आत्महत्येची बातमी आपण वाचत असतो. कधी फक्त त्यावर नुसतीच नजर टाकतो, तर कधी वाचतो. वाचल्यावर आपण त्याबद्दल हळहळ व्यक्त करायला विसरत नाही. काही वेळा ही आत्महत्या सामुहिक स्वरुपाची असते, अश्या वेळी बरिच चर्चा वेगवेगळ्या गटात होत असते. “एखाद्या व्यक्तीने आपले आयुष्य स्वत:च्या हाताने संपविणे म्हणजे आत्महत्या”, अशी आत्महत्येची सर्वसाधारण व्याख्या मानली जाते. बहुतांश आत्महत्या या मानसिक दडपणातून वा तणावामुळे घडतात, असे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून दिसून येते. कधी या आत्महत्येची कारणे काय? याची उत्तरे देऊन जातात, तर कधी अनेक अनुत्तरित प्रश्ने देऊन जातात.